Thane Monsoon Rainfall Pudhari
ठाणे

Thane Monsoon Rainfall: ठाण्यात १० दिवसांत १,२७३ मिमी पाऊस, तक्रारी सातपट

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची कसरत...

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: यंदाच्या मान्सूनने ठाणे शहराला सुरुवातीपासूनच चांगलाच तडाखा दिला. २८ जून ते ७ जुलै या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत शहरात तब्बल १,२७३ मिमी पावसाची नोंद झाली.

या काळात मुसळधार पाऊस, ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे, खाडीची भरती आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची मोठी कसोटी लागली. मात्र, यंदा मान्सूनपूर्व केलेल्या व्यापक नियोजनामुळे परिस्थिती हाताळण्यात यश आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मान्सून सुरू होण्यापूर्वीच एप्रिल महिन्यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, धोकादायक झाडे, सखल भाग, आपत्कालीन यंत्रणा, आरोग्य विभाग, अग्निशमन दल तसेच इतर विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

गतवर्षीच्या अनुभवां- आधारे प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदऱ्या निश्चित करून वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यात रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, महावितरण, टोरंट पॉवर, होमगार्ड, एअर फोर्स, विविध शासकीय संस्था आणि सामाजिक संघटनांसह संयुक्त समन्वय बैठक घेण्यात आली.

आपत्ती काळात कोणत्याही विभागात समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. यंदाच्या तयारीतील सर्वात मोठा बदल म्हणजे सखल भागांतील पंपांची संख्या वाढविणे. गेल्या वर्षी शहरातील ६६ ठिकाणी पंप बसविले होते.

मात्र, वारंवार पाणी साचणाऱ्या भागांचे सर्वेक्षण करून यंदा ही संख्या वाढवून १०२ केली. एवढ्यावरच न थांबता प्रत्येक पंपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले असून त्यांचा थेट प्रवेश आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली, याचे थेट निरीक्षण करून काही मिनिटांतच पंप सुरू करण्याचे आदेश देणे शक्य होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठाणे शहरात शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही नेटवर्कचेही आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांवर २४ तास नजर ठेवणे शक्य झाले आहे.

त्याचबरोबर नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन संपर्क पुस्तिका, 'आपत्ती व्यवस्थापन आराखडा-२०२६', भरतीच्या वेळांची माहिती देणारे फलक आणि जनजागृती साहित्यही शहरभर वितरित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांना शोध, बचाव, सुटका, रॅपलिंग व बोट चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

पुणे येथे एनडीआरएफच्या प्रशिक्षकां -कडून टीडीआरएफच्या जवानांना रॅपलिंगचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले. मान्सून सुरू झाल्यानंतर महापालिकेने आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवली. नऊही प्रभाग समित्यांमध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. प्रत्येक प्रभागात अतिरिक्त मनुष्यबळ, जेसीबी, वाहने, पंप, जेटिंग मशीन व आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन सत्रांत नियुक्ती केली असून टीडीआरएफच्या स्वतंत्र २ पथकांना सतत सज्ज ठेवण्यात आले. मान्सून काळात कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स डॉक्टर, वॉर्डबॉयसह २४ तास उपलब्ध ठेवण्यात आली. ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रार निराकरणासाठी जेटिंग वाहनेही कार्यरत ठेवली.

रस्त्यावर झाड किंवा फांदी पडल्यास ती त्वरित हटविणे, रस्त्यावर तेल सांडल्यास अपघात टाळण्यासाठी तातडीने साफसफाई करणे, शेड कोसळल्याच्या घटनांत गॅस कटरसह पथके घटनास्थळी पाठविणे, आदी जबाबदाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पार पाडल्या.

१ जुलैपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी ठाण्यात दाखल करण्यात आली. विशेषत: दिवा परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोटी व अत्यावश्यक साहित्यांसह एनडीआरएफला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते.

२८ जून ते ७ जुलै या कालावधीत शहरात विक्रमी पाऊस झाला. ५ जुलै रोजी सर्वाधिक २०८.५३ मिमी, तर ४ जुलै रोजी १८४.६६ मिमी पावसाची नोंद झाली. या संपूर्ण कालावधीत आयएमडीने अतिवृष्टीसह ताशी ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला होता. परिणामी शहरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या, तर भरतीमुळे सखल भागांत पाणी साचले. मात्र, पंप तातडीने सुरू करून पाण्याचा निचरा केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विशेषत:, प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या केवळ दहा दिवसांत प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या ही २०२५च्या संपूर्ण पाच महिन्यांच्या मान्सून हंगामातील तक्रारींपेक्षा सुमारे सातपट अधिक होती. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री व विशेष पथके उपलब्ध करून दिली आहेत. प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, तक्रारींचा पाठपुरावा करून तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT