Thane Building Fire Pudhari
ठाणे

Thane Building Fire: आग लागलेल्या रहेजा कार्लाइन इमारतीतून 50 रहिवाशांची केली सुखरूप सुटका; ७ मजल्यांचे नुकसान

अग्निशमन दल, टीडीआरएफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: दिवाळीच्या पहिल्या दिवशी रहेजा गार्डन मधील रहेजा कार्लाइन या १७ मजली इमारती इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून, पाहता पाहता ही आग १४ व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीमध्ये अडकलेल्या ५० रहिवाशांची रात्री उशिरा सुखरूप सुटका करण्यात आली.

रहेजा कार्लाइन इमारतीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

दरम्यान या आगीबद्दलची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. यानंतर आगीमुळे वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच शक्य त्यांनी इमारतीच्या रिफ्युजी एरियामध्ये तर उर्वरित नागरिकांना इमारतीच्या गच्चीत जाऊन थांबण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांना शिडी आणि स्ट्रेचरच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आगीमुळे धूर निर्माण झाल्याने इमारतीची लिफ्ट वापरता येत नव्हती. मात्र रात्री उशिरापर्यंत या इमारतीत अडकलेल्या सर्वच्या सर्व ५० रहिवाशांना तसेच त्यांचे कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांना देखील सुखरूप वाचवण्यात आले.

ही आग नक्की फटाक्यामुळे लागली का शॉर्ट सर्किटमुळे लागली याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र वेळीच मदत मिळाल्याने आणि ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता ही आग आटोक्यात आणता येणे शक्य झाले.

या बचावकार्यात अग्निशमन पथकाने अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यामुळे रहिवाशी नक्की कोणत्या मजल्यावर अडकून पडले आहेत ते शोधणे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. वेळीच मदतीला धावून येत नागरिकांना सुखरूप सुटका केल्याबद्दल रहेजा गार्डन मधील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, मीनल संख्ये यांच्यासह ठाणे मनपा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दलाचे अधिकारी, टीडीआरएफ पथकांचे कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात रॉकेट व तत्सम फटाके फोडण्यावर बंदी

फटाक्यांमुळे ठाण्यासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आग लावून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक हवेमध्ये उडणारे रॉकेट व तत्सम फटाके उडवत असल्याने आगीच्या दुर्घटनेमध्ये वाढ होण्याची आणि कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सुरक्षेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहार.

यामुळे आजपासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवार आणि सर्व रहिवासी भागात रॉकेट व तसम उडवण्याच्या फटाक्यांच्या वापरावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बंदी घातली आहे. आगीच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ आपत्कालीन उपाययोजना करणे, रॉकेट व तसम फटाक्यांवर कायदेशीर प्रतिबंध घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, रहिवासी भागात, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, इमारतीमधील रिफ्यूजी एरिया, वाहनतळ किंवा गच्ची येथून मोठ्या प्रमाणावर रॉकेट, हवेत उडणारे फटाके व तसम फटाके उडविले जात असल्याचे तसेच अशा फटाक्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना निदर्शनास येत आहेत.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत रॉकेट व तसम उडवण्याच्या फटाक्यांच्या वापर करण्यावर पूर्ण प्रतिबंध राहील. हे प्रतिबंध सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारारे आणि सर्व रहिवासी भागात लागू राहील. हा आदेश ९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या रात्रौ १२.०१ वाजेपासून ते ८ जानेवारी २०२७ रोजीच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत पर्यंत लागू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT