ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानक, मेट्रोची स्थानके तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र ही सेवा घ्यायची असेल, तर शुल्क मोजावे लागणार आहे. यापूर्वी देखील शहरात वायफाय सुविधा देण्याची योजना आखली होती, मात्र ही सुविधा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
ठाणे शहराला मोफत वायफाय सुविधा देण्याची ठाणे महापालिकेकडून यापूर्वी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मोफत वायफाय सेवा देणाऱ्या संबंधित कंपनीने परस्पर कनेक्शन विकून लाखो रुपये कमवत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या नगरसेवकांनी त्यावेळी सर्वसाधारण सभेत केला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवकांनी त्यावेळी केली होती.
आता पुन्हा एकदा शहरात मोफत वायफाय देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी शासनाचा निधी देण्याची तयारी देखील दर्शवली आहे.
कंपनीशी लवकरच करार...
संबंधित कंपनीशी यांदर्भात लवकरच करार करण्यात येणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानक, मेट्रोची स्थानके तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर ठाणेकरांना यासाठी शुल्क मोजावे लागणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.