

ठाणे : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरून भीमाशंकरला निघालेल्या वाहनात चालकासाह पाचजण प्रवास करीत असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक घोडबंदर रोडवर चार चाकी वाहन पेटल्याची घटना घडली. घोडबंदर रोड पातलीपाडा ब्रीजवर हा ‘बर्निंग कार’चा थरार पाहायला मिळाला.
सुदैवाने या वाहनातील पाचही जण सुखरूप बचावले.आगीत कार जळून खाक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या घटनेने पातलीपाडा उड्डाण पुलावरून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीच्या तब्बल एक तास खोळंबा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. शुक्रवारी मध्यरात्री पातलीपाडा उड्डाणपुलावर एका चारचाकी कारला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांनी, आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांसह कासारवडवली पोलिसांनी धाव घेतली.
याचदरम्यान आगीमुळे त्या उड्डाणपुलावरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
वाहतूक धिम्या गतीने...
उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला दिसत असल्याने रात्री बघ्यांचीही रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती. साधारणपणे 35 ते 40 मिनिटांनी पूर्णपणे त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. उड्डाणपुलावरील वाहतूक तासभर थांबवून वाहतूक सेवा रस्त्यावरून धिम्या गतीने सुरू होती, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
सुदैवाने पाचजण बचावले
सदर कार ही रमेश राऊत यांच्या मालकीची असून ती कार राजेश राऊत हे चालवत होते. ते भाईंदर येथून भीमशंकरला चार प्रवासी घेऊन निघाले होते. पातली पाडा उड्डाणपूल उतरताना, कारमधून धूर येण्यास सुरुवात झाल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत कार बाजूला लावून ते पाच जण बाहेर आल्याने बचावले. त्यानंतर कारने पेट घेतला. क्षणात कारला भीषण आग लागल्याने कार जळून खाक झाल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.