Pradeep Purnekar Case pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar Case | ‘पोलिसांनी त्यावेळीच तक्रारींचे निवारण केले असते, तर ही घटना घडली नसती’

निवडणुकीचा संदर्भ देत शिवसेनेचेच नगरसेवक संजय भोईर यांचा मीनाक्षी शिंदेवर निशाणा, पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करणार

पुढारी वृत्तसेवा

Thane Shiv Sena Sanjay Bhoir vs Meenakshi Shinde

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धमकीचे संदेश मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनीही गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आपले बंधू भूषण भोईर यांनाही मीनाक्षी शिंदे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांचे निवारण झाले नाही. पोलिसांनी तेव्हाच तक्रारींची दखल घेतली असती, तर आजची घटना घडली नसती, असा दावा संजय भोईर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कुटुंबातील सदस्याला ‘अगला नंबर तेरा’ असा धमकीचा संदेश मिळाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय भोईर यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर कुटुंबीयांना तातडीने तीन पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे भोईर यांनी सांगितले.

पूर्णेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, त्यांच्या घरची परिस्थिती पाहता त्यांना आधार देण्याची गरज आहे. मी पहिल्या दिवसापासून या कुटुंबीयांसोबत आहे. आगरी-कोळी समाजाच्या दृष्टिकोनातूनही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करावा, असेही भोईर म्हणाले.

पूर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसह कुटुंबीयांच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यानंतर याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील, असे संजय भोईर यांनी स्पष्ट केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या बंधू भूषण भोईर यांनाही निवडणुकीच्या काळात शिवीगाळ आणि धमकीचा सामना करावा लागल्याचा आरोप संजय भोईर यांनी केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यावेळी केलेल्या तक्रारींवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर परिस्थिती वेगळी असती, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT