ठाणे : महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची महायुती होणार नाही. या अपेक्षेत राहिलेल्या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असून ठाण्यात महायुती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने या सर्व इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे ठाण्यात तरी महायुती होऊ नये यासाठी शिवसेनेतील इच्छुकांनी एल्गार पुकारला आहे. शनिवारी ठाण्यातील जय भगवान हॉलमध्ये सायंकाळी एक मेळावा घेण्यात आला असून हा मेळावा प्रभाग क्रमांक 21 मधील निवडणुकी संदर्भात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून या सर्व नाराज मंडळीने महायुती होऊ नये अशीच इच्छा व्यक्त केली आहे. नेत्यांना युती हवी आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं यामध्ये मरण होणार आहे. त्यामुळे महायुती करू नका अशी एक मोठी मागणी या मेळाव्यात नाराजांनी केली आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई तसेच अन्य महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये लढतील हे जवळपास निश्चित झाले आहे. सुरुवातीला युती होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. युती झाली नसती तर दोन्ही पक्षातील इच्छुकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार होती. मात्र आता ठाण्यात युतीचे स्पष्ट संकेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांने दिले असल्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. शनिवारी प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेतील नाराजांनी एक मेळावा घेतला असून या मेळाव्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल तर युती होऊ नये अशी भूमिका या मेळाव्यात नाराजांनी व्यक्त केली आहे.