ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा आग्रह धरणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडील निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी काढून युवा आमदार निरंजन डावखरे यांच्यावर आज सोपविण्यात आली आहे. यातून ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी झुकते माफ देऊन मुंबईचा मार्ग मोकळा केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक भाजपने स्वतंत्रपणे लढवून भाजपचा महापौर बनविण्याचा विडा वनमंत्री गणेश नाईक यांनी उचलून शिवसेनेला लक्ष्य केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. त्यामुळे युती होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. १३१ प्रभागातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली.
अखेर मुंबई जिंकण्यासाठी ठाण्यात शिवसेनेला झुकते माफ देण्याचा निर्णय होऊन युती करण्यावर पक्ष नेतृत्वाने एकमत जाहीर केले. त्यानंतर ठाणे भाजपात असंतोष निर्माण झाला. १८ ब्लॉक अध्यक्षांनी युती विरोधात मोहीम उघडून मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्षांना पत्र पाठवून युती तोडण्याची मागणी केली. हा वाढता विरोध लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने महत्वाचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा आग्रह धरणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडूनच ठाण्याची जबाबदारी काढून घेत विरोधातील हवा काढल्याची चर्चा रंगली आहे. नाईक यांच्याऐवजी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची ठाणे महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. भाजपच्या या कृतीतून ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डावखरे यांचा संघटनात्मक अनुभव, समन्वय कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनातील सक्षम नेतृत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.