WhatsApp hacking risk | सावधान! व्हॉटस्अ‍ॅप हॅक होण्याचा धोका 
ठाणे

Thane Police Commissioner | ठाणे पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक! स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडिओ

पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसू लागल्याने हा प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

Thane Police Commissioner WhatsApp Account Hacked

ठाणे : सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणाऱ्या पोलिसांनाच सायबर हल्ल्याचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर १५ ते २० अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसू लागल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. याबाबत पत्रकार आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता, पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच काही वेळातच संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद करण्यात आले. या प्रकारामागे नेमके कोण आहे आणि खाते कशा पद्धतीने हॅक करण्यात आले, याचा तपास ठाणे सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याच मोबाईलचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सायबर गुन्हेगारांचे आव्हान किती गंभीर बनले आहे, याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर ठाणे शहर पोलीस दलाने तातडीने प्रसिद्धीपत्रक जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.

तसेच संबंधित स्टेटसवरील व्हिडीओ डाउनलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत. त्या खात्यावरून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद संदेशाला अथवा लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते नेमके कोणी आणि कशा पद्धतीने हॅक केले, याचा शोध आता सायबर पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT