ठाणे: ठाण्यात वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीदरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयित कारचालकांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली.
कापूरबावडी आणि कळवा परिसरातील या घटनांमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून दोन्ही संशयित कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही कार कर्नाटक नोंदणीच्या असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदीत पोलिसांच्या अंगावर कार घालून पळून जाण्याची घटना कळवा वाहतूक उपविभागाच्या पथकाने नाकाबंदी दरम्यानघडली. या घटनेत कळवा वाहतूक उपविभाग कार्यालयाचे कर्मचारी पोलीस हवालदार सोनवणे, महिला पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई वैद्य आणि मनवर यांनी विटावा ट्राफिक ऑफिससमोर नाकाबंदी सुरू केली होती.
यावेळी एक संशयित क्रेटा कार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरून क्रेटा कारचा पाठलाग केला. तर एक किलोमीटरच्या अंतरावर आरोपीने कार सोडून पलायन केले. वाहतूक पोलिसांनी क्रेटा कार जप्त केली.
कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या पोलिसांनी कर्नाटक नोंदणी असलेल्या किया सेल्टोस कार संशयावरून गोल्डन क्रॉस परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह नाकाबंदीत अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी क्रेटा चालक याने पोलिसांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करीत पळून गेला. त्यावेळी नाकाबंदीवर कर्तव्यावर असलेल्या अश्रू हाके, सागर सांगवे आणि सहकाऱ्यांनी गोल्डन क्रॉस येथे संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालून भरधाव वेगाने घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची पल्सर दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला.
घोडबंदर दिशेने तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी स्वतः पाठलाग केला.आरोपी वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता तसेच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता. अखेर कारला विजय गार्डन सिग्नलजवळ पोलिसांनी कार अडविली चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.