

ठाणे: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेली सर्व कामे ही येत्या 30 मे पर्यंत पूर्ण करावीत. 30 मे नंतर कोणतेही काम घोडबंदर रोडवर सुरू राहणार नाही यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा.
आपत्ती काळात जलदगतीने नागरिकांना प्रतिसाद देण्याबाबतच्या सूचना देत असतानाच लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवण्याचे निर्देशही आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणांना दिले.
मान्सून कालावधीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष, रेल्वे, कोस्ट गार्ड, पोलीस आणि महापालिकेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवणे. पावसाळयात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर आरोप करु नयेत.
सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज रहावे. तसेच सर्व विभागांचेआपत्ती व्यवस्थान कक्ष 247 कार्यान्वति ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
सदर बैठकीत अतिवृष्टी, भरती, पूरसदृश्य परिस्थिती, तसेच खड्डे दुरूस्ती, सखल भागात साचणारे पाणी, पंपिंग स्टेशन, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला. स्टेशन परिसरात ब्लिंकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
तसेच मान्सून कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.सखल भागातील पंप कायान्वित असतील याची दक्षता घ्यावी, कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दक्षता घ्यावी, स्ट्रीट पोल व उघड्या केबल्सची तपासणी करावी, रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करावा, कंट्रोल रूम सज्ज ठेवावा, तसेच प्रभाग नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या.
खड्डा पडल्यास तात्काळ दुरुस्ती करावी
अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावर खड्डा पडल्यास तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा. रस्ता कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारितील असला तरी नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मान्सून कालावधीत खड्डा दुरूस्त करण्याची कार्यवाही ठाणे महापालिका करेल असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी. प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमावा तसेच सर्व विभागांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ समन्वय साधून कार्यवाही करावी.