Thane Crime Pudhari
ठाणे

Thane Crime: चोराची शक्कल फेल; पोलिसांचा डाव यशस्वी! १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून मुसक्या आवळल्या

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर बदलायचा लोकल;

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: बंद दुकाने हेरून घरफोड्या करणाऱ्या पश्चिम बंगालच्या एका अट्टल चोरट्याचा १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला.

पोलिसांना चकवा देण्यासाठी तो प्रत्येक रेल्वे स्थानकावर लोकल बदलत प्रवास करत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत खडवली येथून त्याला शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज रामदास चौव्हान (३०, रा. पश्चिम बंगाल) असे असून, त्याच्याकडून ६५ हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. चोरीतून मिळालेल्या पैशांची मौजमजा करून रक्कम संपताच तो पुन्हा घरफोड्या करत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे.

नौपाडा परिसरातील एका कपड्यांच्या दुकानाचे कुलूप फोडून रोख रक्कम चोरी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ आणि परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपी ठाणे रेल्वे स्थानकातून लोकलने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर उतरून दुसरी लोकल पकडत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी खडवली येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे निष्पन्न झाले.

सापळा रचताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला घरफोडीची हत्यारे बाळगत असतानाच जेरबंद केले. चौकशीत त्याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बंद कपड्यांची दुकाने, मोबाईल शॉप, वाईन शॉप आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली.

या कारवाईत नौपाडा पोलिस ठाण्यातील चार, ठाणेनगर पोलिस ठाण्यातील एक आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यातील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वी डोंबिवली, तुळींज आणि पायधुनी पोलिस ठाण्यांमध्येही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT