Crime News Pudhari
ठाणे

Thane Crime | मॅनेजरकडून पगार मागणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर

पूर्णेकर हत्या प्रकरण ताजे असतानाच ठाण्यातील पाचपाखाडीत पुन्हा चाकू हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Panchpakhadi Manager Attacks Employees

ठाणे : पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाणे शहर हादरले असतानाच पाचपाखाडी परिसरात दोन कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थकीत पगाराची रक्कम मागण्यासाठी दुकानात गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर दुकानातील मॅनेजरने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन्ही कर्मचारी जखमी झाले असून, हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेले दोन्ही तरुण गेल्या काही वर्षांपासून संबंधित दुकानात डिलिव्हरीचे काम करीत आहेत. त्यांचा पगार थकीत असल्याने ते सातत्याने मॅनेजरकडे पैशांची मागणी करीत होते. मात्र, ‘आज देतो, उद्या देतो’, असे सांगून पगार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, ३० तारखेपर्यंत पगार देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर दोन्ही कर्मचारी पगार घेण्यासाठी दुकानात गेले होते. मात्र, पगार देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुकानातील एका जबाबदार व्यक्तीने कटरसदृश धारदार शस्त्राने हातावर वार केल्याचा दावा जखमी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

हल्ल्यात दोन्ही तरुणांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने पोलिसांकडून त्याची तपासणी केली जात आहे.

पूर्णेकर हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच पाचपाखाडी परिसरात पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT