Thane Palghar Mayor Election Pudhari
ठाणे

Thane Palghar Mayor Election: ठाणे–पालघर पट्ट्यात सत्तांतर; पाच महानगरपालिकांत नवे महापौर विराजमान

प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम; ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिंदे सेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे गेली 4 वर्षे महानगरपालिकेत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. शर्मिला पिंपळोलकर या ठाणे महापालिकेच्या 23 व्या महापौर ठरल्या आहेत. या निवडणुकीच्या वेळी सभागृहात सर्व 131 नगरसेवक उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महापौर, उपमहापौरांनी पदाची सूत्रे स्वीकारत ठाण्याचा कारभार सुरू केला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 14 व्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी, तर भाजपाचे राहुल दामले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी (मुंबई शहर) आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत ही घोषणा झाली. तब्बल सव्वा पाच वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर या महापालिकेत लोकप्रतिनिधी राजवट सुरू होत असल्याने महापौर निवडणुकीला उपस्थित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

तब्बल चार वर्षे प्रशासकीय सत्तेखाली असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेत अखेर लोकनियुक्त नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला. बिनविरोध निवडीनंतर मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिंदे सेनेच्या अश्विनी निकम यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेच्या राजकारणात स्थैर्य आले असून, शहराच्या रखडलेल्या विकासाला आता गती मिळेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेत मराठीच महापौर व्हावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने मंगळवारी, महापौर निवडणुकीच्या दिवशीच महापालिकेवर मोर्चा काढला. समितीचा हा विरोध मोर्चा पोलिसांनी मोडून काढत मोर्चेकऱ्यांना थोपवून धरले आणि या गदारोळात भारतीय जनता पक्षाने महापौरपदावर भाजपच्या डिंपल मेहता यांची, तर उपमहापौरपदावर ध्रुवकिशोर पाटील यांची बहुमताने निवड केली.

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे आजीव पाटील 71 विरुद्ध 44 मतांनी जिंकले. उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची निवड झाली. आजीव पाटील हे विरारचे सातवे महापौर ठरले आहेत. भाजपने दोन्ही पदांसाठी अर्ज भरल्याने निवडणूक झाली. महापौर आजीव पाटील यांनी या यशाचे श्रेय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी गेली तीन दशके केलेल्या कामांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT