Thane Palghar District Central Cooperative Bank Election pudhari photo
ठाणे

Thane Palghar District Central Cooperative Bank Election : जिल्हा बँकेत भाजप विरुद्ध भाजप सामना रंगणार

सीताराम राणे, निलेश सांबरे, स्वप्नील शिंदे यांच्या लक्षवेधी लढती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहचले असताना ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मात्र सर्व नेते हातात हात घालून बँकेवर झेंडा फडविण्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. तसेच माजी मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यानिमित्ताने भाजपमधील वाद पेटला आहे.

सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार पॅनलच्या निमित्ताने कथोरे यांना ताकद दिली असून परिवर्तन पॅनलचे प्रमुख माजी मंत्री पाटील हे पक्ष नेतृत्वाच्या मदतीने लढत आहेत. नाराज अपक्षांनी आव्हान निर्माण केल्याने सर्व पक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान आज निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी सर्व पॅनल आणि उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले.

ठाणे जिल्हा बँकेच्या ११ सदस्यांसाठी २७ जून रोजी चार हजार २७ मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. आज सर्व उमेदवारांना चिन्हे मिळाली आहेत. जुन्या संचालकांचा भरणा असलेले सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल अशी थेट लढत होणार आहे. शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांना दोन्ही पॅनलने डावलल्याने ते विक्रमगड तालुका आणि ओबीसी राखीव मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम करणारे सांबरे यांच्या उमेदवारीमुळे विक्रमगड मतदार संघामध्ये संदीप पावडे, सुनील पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. या मतदार संघात दोन्ही पॅनलने अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे सांबरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शहापूर तालुक्यामध्ये सहकार पॅनलचे प्रकाश वरकुटे, अनिल निचिते आणि विद्या वेखंडे अशी तिरंगी लढत होणार असून जव्हारमध्ये सहकार पॅनलच्या ज्योती पटेकर आणि बळवंत गावित अशी थेट लढत होईल. पालघरमधून सहकार पॅनलचे विद्यमान संचालक नागेश पाटील आणि अनिल गावड यांच्यात थेट लढत आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावरील या दोन्ही पॅनलमध्ये उमेदवार उभे न करून भाजप मतदार आणि कार्यकर्त्यांना नाराज न करण्याची भूमिका परिवर्तन पॅनलने घेल्याचे दिसते.

गृहनिर्माण संस्था, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात परिवर्तन पॅनलचे नगरसेवक सिताराम राणे यांच्या विरोधात सहकार पॅनलतर्फे रंभाजी जगताप आणि सत्यवान पाटील निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तिन्ही उमेदवार ठाण्यातील आहेत. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या राणे यांनी गृहनिर्माण सोसाट्यांसाठी खूप काम केलेले असून रंभाजी जगताप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत.

इतर मागासवर्ग मतदारसंघात सहकार पॅनलतर्फे शिवसेनेचे स्वप्नील मुंबईकर आणि परिवर्तन पॅनलतर्फे हार्दिक राऊत रिंगणात असून निलेश सांबरे प्रकाश भोईर व कैलास पाटील यांच्या उमेदवारीमुळे अटीतटीची पंचरंगी लढत होणे अपेक्षित आहे. ही जाग जिंकणे सहकार पॅनलच्या सर्व पक्षीय नेत्यांसाठ प्रतिष्ठेची असणार आहे. या मतदार संघात सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात आहेत.

महिला राखीव मतदारसंघात अशी असेल लढत

महिला राखीव मतदारसंघात सहकार पॅनलच्या विद्यमान संचालक नीता कांबळी, स्मिता घोडविंदे आणि परिवर्तन पॅनलच्या दिपाली पाटील, सुवर्णा पावशे यांच्यात थेट लढत आहे. पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघात सहकार पॅनलचे विशाल कुऱ्हाडे, परिवर्तन पॅनलचे प्रभू गोविंद पाटील आणि शेखर निकम यांच्यात तिरंगी लढत असेल. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात सहकार पॅनलचे विद्यमान संचालक निवृत्ती घुसेकर आणि परिवर्तन पॅनलचे राजेंद्र घोलप यांच्यात थेट लढत पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT