ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या सर्व पक्षीय सहकार पॅनेलने २१ पैकी १६ जागा जिंकत बँकेवर आपली सत्ता कायम ठेवली आहे.
भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनेलने चार तर निलेश सांबरे यांच्या रूपाने एक अपक्ष संचालक बँकेवर निवडून आले आहेत. या विजयाने जिल्हा बँकेवरील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, आमदार किसन कथोरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जादू कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालकांपैकी १० संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ संचालकांसाठी झालेल्या मतदानाची रविवार मतमोजणी झाली. त्यामध्ये सहकार पॅनेलने आपला करिष्मा कायम ठेवत भाजपने दिलेले आव्हान परतावून लावले.
माजी मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव केला आणि भाजपचे आमदार किसन कथोरे आणि हितेंद्र ठाकूर यांची जादू प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या मदतीने हितेंद्र ठाकूर यांचे भाचे हार्दिक राऊत यांनी बंड करून आव्हान दिले होते.
अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार किसन कथोरे यांच्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलने करामत करीत परिवर्तन पॅनलला धूळ चारली. गृहनिर्माण, खरेदी विक्री संस्था मतदार संघातून सहकार पॅनलचे उमेदवार रंभाजी जगताप यांनी परिवर्तन पॅनलचे नगरसेवक सिताराम राणे यांचा पराभव केला.
जगताप यांना १५५१ मते, तर राणे यांना १ हजार ६९ मते पडली. गृहनिर्माण क्षेत्रात नवखे असलेल्या जगताप यांनी हाउसिंग फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष सीताराम राणे यांचा ४८२ मतांच्या फरकाने पराभव करणे म्हणजे उपमुख्यंत्री शिंदे आणि सहकार पॅनलच्या नेत्यांचा विजय म्हटला जात आहे.