

मुंबई: अकरावी प्रवेशाच्या शून्य तसेच नियमित फेरीत मुंबई विभागात वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली असून पुणे विभागात विज्ञान शाखेचा दबदबा कायम आहे. तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि नागपूर विभागांत कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, यंदा प्रवेशासाठी २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत शून्य व तीन नियमित अशा फेरीतून राज्यभरात ७ लाख ७८ हजार २२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
त्यामध्ये विज्ञान शाखेत सर्वाधिक ३ लाख ४८ हजार १५१, कला शाखेत १ लाख ६९ हजार ७८५ आणि वाणिज्य शाखेत १ लाख ३१ हजार ११३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय विविध कोटा प्रवर्गांतून १ लाख २९ हजार १७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अकरावी प्रवेशाच्या आकडेवारीतून विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ग्रामीण आणि निमशहरी भागात स्पर्धा परीक्षा, प्रशासन, अध्यापन आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसाठी कला शाखेला अद्यापही पसंती मिळत आहे तर कोल्हापूर आणि लातूर विभागांतही विज्ञान शाखेला तुलनेने अधिक पसंती मिळाली असली तरी कला शाखेतील प्रवेशांची संख्या वाणिज्यच्या तुलनेत जास्त आहे. रोजगाराभिमुख आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत असताना, ग्रामीण भागात कला शाखेचे आकर्षण अद्याप कायम आहे.