डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे चिकनघर परिसरामध्ये एका इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीजवळ रंगकाम करत असलेला एक ४६ वर्षीय पेंटर तोल जाऊन इमारती खालच्या खोल खड्ड्यात पडला. जखमी पेंटरला त्याच्या सहकाऱ्यांनी तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मणकेश सिताराम चौहाण (४६) असे मृत पेंटरचे नाव असून हा पेंटर मूळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याच्या सियारामपूर गावचा रहिवासी आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात नव्या/जुन्या इमारतींना रंग देण्याचे कंत्राट मणकेश चौहान आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने घेत असे. या पेंटरच्या मृत्युला कारणीभूत ठरल्या प्रकरणी कामगार ठेकेदार गुड्डुकुमार कसौधन (३५) यांनी महात्मा फुले चौक ठाण्यात तशी माहिती दिली. मणकेश चौहाण यांना कामगार ठेकेदार गुड्डुकुमार कसौधन यांनी कल्याण पश्चिमेकडील रामबाग/चिकनघर परिसरात असलेल्या राॅयल इमारतीला रंगकाम दिले होते.
त्याप्रमाणे गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे या इमारतीचे रंगकाम सुरू केले. तेराव्या मजल्यावर रंग देण्याचे काम सुरू असतानाच तोल गेल्याने कोसळलेल्या मणकेश चौहाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खड्ड्यात पडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी आणि इमारतीत काम करणाऱ्या इतर मजूरांनी उचलून मणकेशला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलिस निरीक्षक विजय नाईक आणि पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक हुनमंत हुंबे अधिक तपास करत आहेत.