पडघा आरोग्य केंद्रातील उपकेंद्रे बंद अवस्थेत pudhari photo
ठाणे

Thane rural health issues : पडघा आरोग्य केंद्रातील उपकेंद्रे बंद अवस्थेत

ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेली पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारी खालिंग, डोहोळे, वडवली, तळवली, आमणे ही पाच उपकेंद्रे बंद अवस्थेत पडली असून, नागरिकांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गोरगरीब आणि शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाला आहे.

या गंभीर परिस्थितीवर लोकधारा प्रतिष्ठानने आवाज उठवला आहे. उपकेंद्रात डॉक्टर, कर्मचारी नियमित हजर राहण्याबाबत प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी, भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

आरोग्य उपकेंद्रे ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा घरपोच पोहोचविण्यासाठी स्थापन केली जातात. प्रत्येक गावातील नागरिकांना लहानसहान आजारांपासून ते लसीकरण, गर्भवती स्त्रियांची काळजी, बालकांचे आरोग्य तपासणी, क्षयरोग नियंत्रण, स्वच्छता अभियान यांसारख्या अनेक सेवा उपकेंद्रांतून पुरवल्या जातात. परंतु पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या सहा उपकेंद्रांपैकी पाच उपकेंद्रात कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.

या उपकेंद्राच्या आजूबाजूला 30 ते 40 खेडेगावे असून आदिवासी बांधवांना या उपकेंद्राचा फार मोठा आधार असतो; परंतु उपकेंद्र बंद असल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी शासनाकडून हजारो कोटी रुपये सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी खर्च केले जातात. मात्र रुग्णांची होणारी गैरसोय पाहता नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण, डेंग्यू-मलेरिया, पोटाचे आजार, सर्पदंश यांसारखे धोके वाढतात. अशावेळी गावाजवळील उपकेंद्र असूनही येथील रुग्णांना शहरात किंवा खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

यामुळे नागरिकांचा वेळ, पैशाचा अपव्यय होत असून पडघा आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पाच उपकेंद्रांची अवस्था अशीच राहणार की, ती नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष सुरू केली जाणार, याकडे तालुका व जिल्हा आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

आंदोलन छेडणार...

प्रत्येक उपकेंद्रावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ती बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. आरोग्य सेवेतील ही स्थिती पाहता, तत्काळ डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना उपकेंद्रावर नियमित हजर राहणे बंधनकारक केले पाहिजे. अन्यथा ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल. याबाबतीत योग्य ती कारवाई न झाल्यास लोकधारा प्रतिष्ठान तर्फे लवकरच मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असे लोकधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

सविस्तर अहवाल मागवला...

ग्रामीण जनतेचा जीव वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे. तसेच यासंदर्भात भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी नलिनी ठोंबरे व पडघा आरोग्य अधिकारी प्रज्ञेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता उपकेंद्र पूर्णतः बंद नसून काही ठिकाणी डॉक्टर व परिचारिका संपावर गेल्याने कर्मचारी संख्या कमी असल्याने काही उपकेंद्राच्या कर्मचार्‍यांना पडघा येथे कर्तव्य बजावण्यास पाठविले आहे, तरी याबाबत सविस्तर अहवाल कर्मचार्‍यांकडून मागून घेतला आहे, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT