Thane rice farming pudhari photo
ठाणे

Thane rice farming : पावसाच्या खंडाने ठाणे जिल्ह्यातील भातशेती अडचणीत

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : शुभम साळुंके

ठाणे जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असतानाच आता रब्बी हंगामाचे ही संकट उभे राहिले आहे. पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका भातपिकाला बसला आहे. यंदा वेळेत पाऊस न आल्याने भाताची पेरणी रखडली होती. त्यानंतर पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे कमी उगवले होते. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील भाताची सुमारे ३० टक्के पेरणी वाया गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. आता पिकाला पाण्याची गरज असतानाच पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखालील एकूण सरासरी क्षेत्र सुमारे ६० हजार हेक्टर आहे. यापैकी तब्बल ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील अर्थकारण भात पिकाभोवती फिरत असते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यंदा देखील पावसाचे वेळापत्रक बिघडल्याने त्याचा परिणाम भाताच्या पेरणीवर झाला होता. पेरणीसाठी योग्य वेळी पाऊस मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी पुढे ढकलावी लागली होती. तर काहींनी पाऊस पडताच पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने मोठी विश्रांती घेतली आणि जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. पेरणी केलेले बियाणे वाया गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. मात्र या अडथळ्यांवर मात करून शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड केली आहे. मात्र सध्या स्थितीत बियाणं उगवण्याची वेळ आली आणि पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे.

वर्षानुवर्षे शेतीचा खर्च वाढत चालला आहे. त्यात बियाणे, मजुरी,खत आणि मशागतीचा खर्च करून केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. काही भागांत दुबार पेरणी करून पीक उभे करण्यात आले आहे. मात्र आता पिकाला पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने पुढील उत्पादनाचे गणित बिघडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत भात पिकातून लोंब्या बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.

पीक वाढीच्या या टप्प्यावर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, शेतातील पाण्याची पातळी कमी होत आहे. काही ठिकाणी भात लागवड केलेल्या जमिनीला तडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे पिकाची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास त्याचा थेट परिणाम भाताच्या उत्पादनावर होऊ शकतो.

गेल्या चार वर्षांपासून कोकणातील पावसाच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारणे, काही दिवसांचा मोठा खंड पडणे आणि त्यानंतर कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे, असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक पावसाच्या अंदाजावर आधारित शेतीचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे.

यंदाही सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भाताची पेरणी लांबली होती. पेरणीनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने उगवण झाली नाही. त्यानंतर लागवड केलेल्या पिकाला आता पाण्याची गरज असताना पावसाने पुन्हा पाठ फिरवली आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पुढील हंगामाची चिंता सतावू लागली आहे.

"पावसाळ्यात भात पिकासोबत फळ भाज्यांची देखील लागवड केली जाते. परंतु भाताला आवश्यक असणारा पाणी नाही पडत तर फळ भाज्यांना कुठून मिळेल? पाऊस कमी असल्याने रोग जास्त आहेत. त्यामुळे फळभाज्यांचे कमी उत्पादन झाले आहे तर भात पीक हातातोंडाशी आलेली आहेत पाऊस पडला तर सोन घरी येईल अशी अपेक्षा आहे."
आत्माराम म्हात्रे, शेतकरी
"यंदा पाऊस सुरुवातीला पडल्यानंतर पेरण्या करण्यास सुरुवात केली होती. मात्र पेरण्या केल्या आणि पाऊस गायब झाला होता. त्यामुळे भात काही ठिकाणी उगवला नाही तर काही ठिकाणी कबुतरांनी ताव मारून बियाणं खाऊन टाकलं होत. आता पुन्हा पेरणी केल्यानंतर पीक चांगली झाली मात्र हाता तोंडाशी घास येण्याची वेळ झाली आणि पाऊस गायब झाला आहे."
नामदेव पाटील, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT