October Heat  Pudhari
ठाणे

Thane October Heat: ठाण्याला ऑक्टोबर हीटचा तडाखा! कमाल तापमान ३७ अंशांवर; मध्यरात्रीही पारा २९ ते ३१ अंशांवर

कमाल तापमान ३७ अंशांवर; मध्यरात्री पारा २९ ते ३१ अंशांदरम्यान, घटती वृक्षसंख्या आणि डांबरी पृष्ठभागाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: ऑक्टोबर हीटचा तडाखा ठाण्याच्या शहररचनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले असताना मध्यरात्रीही पारा २९ ते ३१ अंशांदरम्यान आहे. वाढते काँक्रीटीकरण, डांबरी पृष्ठभाग आणि घटती वृक्षसंख्या यामुळे दिवसा साठलेली उष्णता रात्रीही टिकून राहत असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहराचा विस्तार होत असताना मोकळ्या जमिनींचे काँक्रीटीकरण, मोठ्या प्रमाणातील बांधकामे, डांबरी रस्ते आणि वाहतुकीत झालेली वाढ यामुळे शहराच्या स्थानिक हवामानावर परिणाम होत आहे.

काँक्रीट आणि डांबर दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात. सूर्यास्तानंतर हीच उष्णता हळूहळू वातावरणात सोडली जात असल्याने रात्री तापमानात अपेक्षित घट होत नाही. शहरांमध्ये दिसून येणाऱ्या या प्रक्रियेला ‘अर्बन हीट आयलंड’ परिणामाशी जोडले जाते.

ठाण्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या वृक्षांचे महत्त्व मोठे आहे. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर बाष्पोत्सर्जनाद्वारे परिसरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.

त्यामुळे रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक जागांमध्ये आणि निवासी परिसरात असलेली जुनी, मोठी झाडे शहरासाठी नैसर्गिक तापमान नियंत्रकाची भूमिका बजावतात. मात्र विकासकामे आणि विविध प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या वृक्षांची संख्या कमी होत गेल्यास त्याचा परिणाम शहराच्या हवामानावर होत असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.

मोकळ्या जमिनींचेही पर्यावरणीय महत्त्व आहे. नैसर्गिक माती सूर्याची उष्णता काँक्रीटच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने हाताळते आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यास मदत करते. मात्र मोकळ्या जागा पूर्णपणे काँक्रीटने झाकल्या गेल्यास पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता कमी होते. त्याचा परिणाम भूजल पुनर्भरण, स्थानिक आर्द्रता आणि शहराच्या एकूण पर्यावरणीय संतुलनावर होतो.

त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’कडे केवळ काही दिवसांच्या वाढलेल्या तापमानाच्या स्वरूपात पाहणे योग्य ठरणार नाही. शहराची रचना, जमिनीचा वापर, वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि हरित क्षेत्र यांचा तापमानाशी असलेला संबंध प्रशासनाने गांभीर्याने विचारात घेण्याची गरज आहे. ठाण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात विकास आवश्यक असला तरी त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीची किंमत मोजावी लागू नये, यासाठी नियोजनात पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे.

वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे

शहराचे तापमान कमी करण्यासाठी केवळ वृक्षारोपणाच्या मोहिमा पुरेशा नाहीत. लावलेली झाडे जगवणे, मोठ्या वृक्षांचे संरक्षण करणे, मोकळ्या जागा राखणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणाऱ्या उपाययोजनांना प्रोत्साहन देणे आणि शक्य त्या ठिकाणी हिरवे पट्टे निर्माण करणे आवश्यक आहे. भविष्यातील शहर नियोजनात काँक्रीटच्या क्षेत्रासोबत हिरव्या क्षेत्राचे प्रमाणही महत्त्वाचे मानले गेले पाहिजे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT