ठाणे: सततची वाहतूक कोंडी, मेट्रो व इतर बांधकामाच्या ठिकाणी अविरत चालणारे मशीन, विविध रॅली व उत्सवात घुमणारा ढोलताशांचा गगनभेदी आवाज, डीजेचा हृदय धडाडणारा ध्वनी व सोबतीला लाउड स्पीकरचे दूरपर्यंत जाणारे संगीत यामुळे ठाण्यातील ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, मोठ्या आवाजाच्या, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टीम व डिजेचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा असे निर्देश आगामी दहीहंडी, गणेशोत्सव आदी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सार्वजनिक उत्सवाच्या मंडळांना देण्यात आले आहेत.
ठाणे हे सांस्कृतिक उत्सवाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता श्रावण मास सुरू झाल्याने साहजिकच उत्सवाचे देखील दिवस सुरू झाले आहेत. दहीहंडी व त्यापाठोपाठ येणारा गणेशोत्सव तर ठाणेकरांसाठी एक आपला आगळावेगळा जत्रोत्सवच. पण, याच सांस्कृतिक उत्सवातील कार्यकर्त्यांच्या अति उत्साहीपणामुळे ठाण्याचे ध्वनी प्रदूषणात मात्र गेल्या काही वर्षात कमालीची वाढ दिसून येत आहे.
तर दुसरीकडे ठाण्यातील रस्त्यांवरील वाढती वाहने आणि वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे कर्नकर्कश हॉर्नच्या आवाजाने देखील ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याची नोंद स्थानिक प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील रस्त्यांवर दिवसागणिक वाढती वाहने आणि वाहतूक कोंडी यामुळे सर्वच रस्त्यांवर कानठळ्या बसवणाऱ्या हॉर्नचा आवाज घोंघावत असतो. सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेले ध्वनी प्रदूषण शहरवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. याशिवाय महाविद्यालय परिसरातून कर्कश्श हॉर्न वाजवित सुसाट वेगाने जाणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत चालली आहे.
७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत असा कायदा आहे. मात्र वाहनधारक ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची हॉर्न बसवतात. या अति डेसिबल हॉर्नच्या विचित्र आवाजांमुळे गाडी चालवण्याची एकाग्रता भंग होऊन अपघातांची शक्यता वाढते. कर्णकर्कश्श हॉर्न वाजविणाऱ्यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून दंड आकारण्याची तरतूद आहे.
दरम्यान, मोठ्या आवाजाच्या, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टीम व डिजेचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा असे निर्देश पोलिसांकडून सार्वजनिक उत्सवाच्या मंडळांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाची नोंद प्रदूषण मंडळाचे पथक करणार असून या नोंदीचा अहवाल पोलिसांना पाठवणार आहेत.
त्यानंतर पोलीस कारवाई करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, उच्च रक्तदाब, तणाव, अनिद्रासारख्या आजारांचा धोका बळावतोय असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रदूषण नियंत्रण पथकाची स्थापना
ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणे गुन्हा आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासास आळा घालण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकाची स्थापना केली आहे. हे पथक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असून ध्वनीप्रदूषण प्राधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकातील सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार असल्यास त्यांनी या पथकाकडे तक्रार करावी, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.