ठाणे : शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या रासायनिक खतांची माहिती वेळेत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने डिजिटल पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या परिसरातील खतांच्या साठ्याची आणि उपलब्धतेची माहिती सहज मिळावी यासाठी विभागाने Blogspot या सुलभ डिजिटल माध्यमाचा वापर करत नवीन माहिती प्रणाली सुरू केली आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील खत उपलब्धतेची आणि साठ्याची माहिती घरबसल्या मिळू शकणार आहे.
या प्लॅटफॉर्मवर तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती रोज अद्यतनित केली जाते. प्रत्येक केंद्राविषयी खतांचा प्रकार, शिल्लक साठा, केंद्र चालकांचे मोबाईल क्रमांक यांसारखी तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी घरातूनच खत साठ्याची माहिती घेऊन योग्य केंद्राची निवड करून वेळ आणि प्रवास वाचवू शकतात. हे डिजिटल माध्यम कोणत्याही स्मार्टफोनवर, कोणतीही अॅप डाऊनलोड न करता वापरता येते.
ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १६२ अधिकृत रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत असून, खरीप आणि रब्बी हंगामात येथे विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री केली जाते. मात्र अनेकदा या खतांची उपलब्धता कळण्यास उशीर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो. या समस्येवर उपाय म्हणून कृषि विभागाने https://adothane.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_72.html?m=1 या संकेतस्थळावर एक पारदर्शक आणि अद्ययावत माहिती प्रणाली सुरू केली आहे. या ब्लॉगद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील केंद्रांवर कोणते खत, किती प्रमाणात उपलब्ध आहे याची नेमकी माहिती मिळते.
“डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना अचूक माहिती वेळेवर देणे हे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे खत खरेदी अधिक नियोजनबद्ध होईल आणि शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.”एम. एम. बाचोटीकर, कृषि विकास अधिकारी