डोंबिवली : गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद ? हा वाद न्यायालयामध्ये सुरू होता. अखेर या वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यपद स्पर्शाने पावन झाल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद ? या संदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. (Kalyan Durgadi Fort Mandir Or Masjid)
दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी कल्याण सत्र न्यायालयाने मंगळवारी केले. 1971 साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरून सुनावणी झाली होती. न्यायालयाने या किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा केल्याचे पहायला मिळाले.
अनेकदा दुर्गाडी किल्ला भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या खटल्याचा निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या इदगाहजवळ नमाज अदा केली जाते. मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवून आतील घंटा बांधली जायची. त्यामुळेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलने करायच्या. या वर्षीही जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांकडून घेतली होती. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते.
90 च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केले. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. दर वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्यावर ऐतिहासीक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कल्याणकरांसह ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये लाखो भक्तांची गर्दी होते.
दुर्गाडी किल्ल्यावर शिवरायांनी स्वत: देवीचे मंदिर उभारल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासीक महत्व आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवाची सुरूवात केली. ही परंपरा आजही कायम आहे. नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ला रोषणाईने उजळून निघतो. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
सातवाहन काळापासून कल्याण हे एक महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जात होते. 1657 पर्यंत कल्याणचा ताबा आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचे महत्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील करून घेतले. या भागाचे भौगोलिक महत्व जाणून छत्रपतींनी कल्याणमधील खाडीकिनारी किल्ला बांधण्याचे ठरविले. किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांना तिथे अमाप संपत्ती सापडली. देवी दुर्गेच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडल्याचे समजून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले आणि त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव पडल्याचे इतिहासतज्ञ तथा अनेक ऐतिहासिक जाणकार सांगतात.