कल्याण: दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूजाचा भाग ढासळला

कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूजाचा भाग ढासळला
कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूजाचा भाग ढासळला

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग गुरूवारी रात्री ढासळला आहे. किल्ल्याच्या डागडुजीची  दुर्गप्रेमींकडून मागणी करण्यात आली आहे.

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला कोठे आहे?

  • कल्याण पश्चिमेकडील भिवंडीला जोडणाऱ्या पुलाजवळ ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला
  • बुरूजाचा काही भाग ढासळला
  • नव्याने बांधलेल्या बुरूजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या आहेत
  • दुर्गप्रेमींसह कल्याणकर नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी

कल्याण पश्चिमेकडील भिवंडीला जोडणाऱ्या पुलाजवळ असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरूज आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षांपूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरूजावर नव्याने बांधकाम केले आहे. या नव्या बुरूजाचा खालचा भाग ढासळल्याचे गुरूवारी रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच नव्याने बांधलेल्या बुरूजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागही कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथराही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या बुरूजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी 25 कोटी रूपयांच्या निधी देण्याची मागणी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी केली आहे.  त्यापैकी सुरूवातीला अडीच कोटी आणि नंतर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप दुर्गाडी किल्ल्याच्या दुरूस्ती कामाला सुरुवात झालेली दिसत नाही.
कल्याणच्या या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच कल्याणच्या खाडी किनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केली. मात्र काळाच्या ओघामध्ये याठिकाणी आता दुर्गादेवीचे मंदिर, काही बुरुज आणि मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ इतकाच भाग शिल्लक राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यपदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कल्याण शहराला लाभलेल्या सुवर्ण क्षणांची ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ल्याचे वैभव जपण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची अपेक्षा दुर्गप्रेमींसह कल्याणकर नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news