ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात गगनभरारी घेणारे बदलापूरचा सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्राफ्ट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे येथील 'स्पेसक्राफ्ट्स विद्यापीठ' संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम साळवे याने स्थान मिळवत ज्युनिअर सायंटिस्टचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या देदीप्यमान कामगिरीबद्दल सोहमला नुकताच प्रतिष्ठित 'बदलापूर रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.
बदलापूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सोहमने वयाच्या अवघ्या नवव्या-दहाव्या वर्षापासून इस्रो-मॅजिका आणि स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू केले होते. गेल्या तीन वर्षांत त्याने अंतराळ आणि ब्रह्मांड या विषयांवर तब्बल तीन पुस्तके लिहिली असून, तो सध्या 'इंटरनॅशनल सायंटिस्ट प्रोग्राम'च्या दुसऱ्या वर्षात संशोधन करत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स स्पर्धेत त्याने सलग दोन वर्षे सहभाग नोंदवून गतवर्षी 'सिल्व्हर ऑनर' तर यावर्षी 'ब्राँझ ऑनर' पटकावले आहे. सोहमने एका लघुग्रहाचाही यशस्वी शोध लावला आहे.
त्याचप्रमाणे, डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अदिती प्रवीण ठक्कर हिनेही अविरत मेहनत घेत अंतराळ विज्ञानात मोठे यश संपादन केले आहे. आठवीत असल्यापासून अवकाश संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अदितीने अंतराळात तब्बल १६ लघुग्रहांचा शोध लावला आहे. तिच्या या संशोधनाची थेट अमेरिकेच्या 'नासा' (NASA) या जागतिक अंतराळ संशोधन संस्थेने अधिकृत दखल घेत आपल्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे.
या दोन्ही बालवैज्ञानिकांचे शिक्षक डॉ. युवराज लांबोळे आणि अवकाश वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेसक्राफ्ट्स विद्यापीठाने इस्रो, नासा अशा नामांकित जागतिक संस्थांशी संलग्नता ठेवली आहे. त्यांच्याकडे ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट, रॉकेट सायंटिस्ट आणि तरुण संशोधकांसह ३७ तज्ज्ञांची भक्कम टीम कार्यरत आहे.
पंतप्रधान आणि इस्रोचे स्वप्न असलेल्या 'हर घर से सायंटिस्ट' या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी या टीमने पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे 'स्पेसक्राफ्ट ॲम्बेसेडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा विनामूल्य अंतराळ प्रशिक्षण उपक्रम राबवणारा ठाणे हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असून, येथूनच पुढे संपूर्ण देशव्यापी मोहिमेची सुरुवात होणार आहे.
या विशेष भेटीदरम्यान डॉ. युवराज लांबोळे, अवकाश वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांच्यासह सोहम साळवे व अदिती ठक्कर यांचे पालक आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे, संशोधक वृत्तीचे आणि पुस्तकरूपी लेखनाचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांना अंतराळ मोहिमांमध्ये भारताचे नाव आणखी मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.