मत्स्याद्योग pudhari news network
ठाणे

Thane News | मच्छीमारांसह निर्यातदारांचे नवीन धोरणाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्य मत्स्याद्योग विकासाच्या नवीन धोरणात पर्ससीन नेट मासेमारीवर आणखी निर्बंध येण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्ससीन नेट मच्छिमार आणि मासळी निर्यात करणार्‍या कंपन्यांना ही भीती वाटू लागली आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये लागू झालेल्या अध्यादेशाने आधीच पर्ससीन नेट मासेमारीचे चार महिने कमी झाले आहेत. त्यात आता नवीन धोरणात कोणते निर्बंध येणार याकडे पर्ससीन मच्छिमारांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्ससीन नेट मासेमारीचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात आहे. पर्ससीन नेट नौकांनी पकडलेली बांगडा, म्हाकूळ आदी मासळी परदेशात निर्यात होते. यातून परकीय चलनासह खलाशी, तांडेल, पागी अशा प्रत्येक नौकेवर 30 ते 35 कामगारांना रोजगार मिळतो. या कामगारांमध्ये स्थानिक कामगार 50 टक्के असला तरी इतर पूरक व्यवसाय आणि रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. मासळी निर्यात करणार्‍या रत्नागिरीत पाच मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे.

पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससीन नेट मच्छिमारांमध्ये टोकाचे वाद आहेत. यातून सन 2016 साली एका अध्यादेशाने पर्ससीन नेट मासेमारीचे चार महिने कमी झाले. शासनाचा हा अध्यादेश लागू होण्यापूर्वी पर्ससीन नेट मासेमारी सप्टेंबरपासून पुढे आठ महिने करता येत होती.राज्य शासनाने मत्स्योद्योग विकास धोरणासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीकडे मासेमारीसंदर्भात आवश्यक अभिप्राय 6 ऑगस्टपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पारंपारिक मच्छिमारांचे संघटन प्रभावी असल्याने त्यांच्या अभिप्रायांकडे मच्छिमारांचे आणि मासळी निर्यात करणार्‍या कंपन्यांचे लक्ष लागले आहे.

चांगल्या गुणवत्तेच्या मासळीला मागणी

पर्ससीन जाळ्यांमध्ये सापडणारी मासळी समुद्राच्या पाण्यातून नौकेत घेईपर्यंत जिवंत असते. त्यामुळे ही मासळी कंपनीत जाईपर्यंत ताजी राहते. पर्यायाने मासळीची गुणवत्ता चांगली रहात असल्याने परदेशात या मासळीला मागणी आहे. अशावेळी या मासेमारीवर आणखी नवीन निर्बंध आले तर कोणते तोटे होतील याकडे कंपन्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT