दापोली : मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला हर्णे बंदरात बिलजी मासळीचा ‘बंपर कॅच’ मासेमारांच्या हाती लागला असून अपेक्षित दर मात्र या मासळीचा मिळालेला नाही. हर्णे बंदरातील मासेमारी हंगामाची सुरुवात छोट्या होड्यांनी केली असून, या होड्यांना मिळणार्या बिलजी मासळीनेच बोहणी झाली आहे. मात्र, सुरुवातीला 100 रुपये प्रतिकिलोच्या पुढे मिळणारा दर अवघा 40 वर आल्याने लहान मच्छिमार चिंतेत पडला आहे.
दि. 1 ऑगस्टला मासेमारी हंगाम सुरू झाल्या नंतरही मोठ्या नौका किनार्यावर राहिल्या तरी हर्णे बंदरात छोट्या होड्यांनी मासेमारीचा मुहूर्त साधत दोन महिन्यांच्या बिलजी मासळी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिली. बिलजी मासळीची मुख्य बाजारपेठ ही गोवा असल्याने हर्णे बंदरातून बिलजीच्या गाड्या रोज गोव्याला जाताना दिसत आहेत. सुरुवातीला बिलजी ला 100 च्या पुढे दर मिळत होता. हर्णे बंदरातील 50 ते 60 छोट्या होड्या सध्या पहाटे 4 वाजता समुद्रात जाऊन सकाळी 9 वाजेपर्यंत किनार्यावर येत आहेत. त्यामुळे गेले 4 दिवस मच्छी मार्केटमध्ये बिलजी मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेली दिसत आहे.
दरम्यान, दि 5 ऑगस्टपासून मोठ्या नौका मासेमारीला सुरवात करणार असल्याने लवकरच कोळंबी, सुरमई, बांगडा, मांदेली, पापलेट आदी विविध प्रकारची मासळी खवय्यांच्या ताटात पाहायला मिळणार आहे. श्रावण सुरू होत असल्या कारणाने बिलजी मासळीला मिळणार्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची चर्चा हर्णे बंदरात सुरू आहे.