ठाणे : ठाणे महापालिकेने सर्व प्रभागाचे अधिकृत नकाशे पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. प्रत्यक्षात प्रारूप मतदार यादीनुसार प्रत्येक प्रभागात नकाशांबाहेरील सात ते आठ हजार मतदार घुसविण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. अवघ्या चार महिन्यात २५ टक्के म्हणजे चार लाख २५ हजार मतदार ठाण्यात कसे वाढले? सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून जाणून बुजून चुकीच्या याद्या वनवणाऱ्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून सोमवारी समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्या अधिकाऱ्याला निलंबित करा अन्यथा मनसे धिंड काढेल, असा इशारा जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
ठाणे महापालिकेने मतदार याद्यांचा प्रारूप आरखडा प्रसिद्ध करून आक्षेप घेण्यास सात दिवसांची मुदत दिली आहे. वाढलेल्या चार लाख २५ हजार मतदारांच्या सतत्येबाबत एवढ्या कमी दिवसात कशी तपासणी होणार आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी ३३ प्रभागांचे नकाशे प्रकाशित केले आहे. त्या नकाशांमध्ये कुठला विभाग, कुठली इमारतीमधील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यांच्या सीमा रेषा निश्चित केलेल्या आहेत. आक्षेपांनंतर प्रकाशित झालेल्या अंतिम नकाशांमध्ये मतदारांची एकूण संख्याही देण्यात आलेली आहे. असे स्पष्टपणे नमूद केले असताना नुकतीच प्रकशित झालेल्या मतदार प्रारूप यादीमध्ये अन्य विभागातील गृहसंकुले, इमारती, परिसरातील मतदार घुसविण्यात आलेली आहेत.
प्रत्यक्षात सीमेवरील मतदारांचा पंचनामा न करता कार्यालयात बसून मतदार याद्या बनविण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस आणि बाहेरील मतदार घुसवून याद्या बनविल्या आहेत, असे जाधव यांनी सांगून प्रभाग ३ चे नकाशे आणि मतदार यादीतील त्रुटी दाखविल्या. प्रभाग ३ मध्ये नाकाशबाहेरील आझादनगर मानपाडा, रेमंड, कोलशेत ढोकाळी गावातील मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे. किमान ७ ते आठ हजार नावे घुसविण्यात आली असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. या खोट्या याद्यांवर मनसे आक्षेप घेणार असून कशाप्रकारे मतदान यंत्रणा विकली गेली आहे, हे स्पष्ट होत असल्याने संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला धडा शिकविला जाणार आहे. ऑनलाईन मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो दिसत नसल्याने बोगस मतदार कसे शोधणार ? मात्र प्रत्यक्षातील मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्रे असून काही मतदारांचा फक्त पत्ता देण्यात आलेला आहे. त्या मतदाराचे नाव आणि फोटोही नाही. असे प्रकार बोगस मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यांना सोमवारी मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या अधिकाऱ्याची धिंड काढून देशभर संदेश दिला जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचे एकाच प्रभागातील तीन याद्यांमध्ये तीन वेळा नावे आली आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचे नावच मतदार यादीतून गायब करण्यात आले आहे.