

सिडको (नाशिक) : महानगरपालिका प्रशासनाने नुकतीच जाहिर केलेल्या प्रारूप मतदार यादीत दुबार मतदारांची संख्या हजारोने वाढल्याने तसेच मतदारांची नावे संबध नसलेल्या दुसऱ्याच प्रभागाच्या यादीत समाविष्ट झाल्याने सिडको,सातपूरसह शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच आमदार सीमा हिरेंनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना मेलव्दारे पत्र पाठवत प्रारूप मतदार यादीतील दुबार नावे तातडीने कमी करून यादीतील चुका दुरुस्त करण्याची आग्रही मागणी केली आहे.
महापालिका निवडणूकींचे लवकरच बिगूल वाजणार असल्याने मनपा प्रशासनाने चार दिवसांपूर्वी प्रारूप मतदार यादी जाहिर केली आहे. परंतु यादी तयार करतांना मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात सुमारे वीस हजाराच्यावर तर एकूण मनपा हद्दीत एन्शी हजाराच्या वर दुबार मतदारांची नावे असल्याचे समोर आले आहे. सिडको परिसरातील अनेक मतदारांचा सातपूर परिसरातील प्रभागात तर पाथर्डी शिवारातील शेकडो मतदारांची नावे सिडकोतील प्रभाग यादीत समाविष्ट झाले आहेत. मतदार यादीतील चुकां संदर्भात नागरिक आमदार सीमा हिरेंकडे संताप व्यक्त करत आहेत.
नागरिकांकडून तकारींची दखल घेत आमदार हिरेंनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयकडे मेलव्दारे एक विशेष पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत हजारो दूबार मतदारांची नावे आहेत. शेकडो मतदारांची नावे संबध नसलेल्या दुसऱ्याच प्रभागाच्या यादीत समाविष्ट झाल्याने सिडको,सातपूर येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करूण इच्छूकांना दिलासा देण्यासाठी प्रारूप मतदार यादीतील दुबार नावे तातडीने कमी करावीत तसेच यादीतील चुका दुरुस्त करण्याची आग्रही मागणी आमदार हिरेंनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.