Fertilizer Booking App Pudhari
ठाणे

Fertilizer registration online: २६ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना घरबसल्या खताची नोंदणी

पिकानुसार खताची शिफारस अन् क्यूआर कोडने मिळणार खत

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना आता खत खरेदीसाठी अधिक पारदर्शक आणि सुलभ प्रक्रिया उपलब्ध होणार आहे. २६ ऑगस्टपासून ‘फार्मर फर्टिलायझर सेल’ या डिजिटल प्रणालीद्वारे खत विक्री सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील गावोगावी कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोबाईल ऍप्लिकेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची माहिती, पिकानुसार आवश्यक खताचे प्रमाण तसेच उपलब्ध खत साठ्याची माहिती मिळणार आहे.

या प्रणालीमुळे खत वितरणातील अनियमितता कमी करण्याबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकांच्या गरजेनुसार खत उपलब्ध करून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शासनाच्या जनरल फर्टिलायझर रिकमेंडेशन नुसार शेतकऱ्यांना खताची शिफारस केली जाणार आहे. ‘फार्मर फर्टिलायझर सेल’ अँपवर शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा शेतकरी ओळखपत्राच्या आधारे नोंदणी करता येणार आहे. ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण केल्यानंतर अँपमध्ये जिल्हा, तालुका, गाव तसेच सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांकाच्या आधारे जमिनीची माहिती प्राप्त करता येईल. त्यानंतर पिकाची निवड केल्यावर संबंधित पिकासाठी आवश्यक खतांची यादी आणि शिफारस केलेले प्रमाण अँपवर दिसणार आहे.

शेतकऱ्याने आवश्यक खताची निवड केल्यानंतर उपलब्ध साठा आणि अंतराच्या आधारे खत विक्रेत्याची निवड करता येणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड आणि टोकन क्रमांक तयार होईल. हा क्यूआर कोड घेऊन शेतकऱ्याला निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जावे लागणार आहे. विक्रेत्याने क्यूआर कोड स्कॅन करून अर्ज आणि खताचे प्रमाण तपासल्यानंतर खत वितरित केले जाणार आहे. नवीन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाकडून गावोगावी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये अँपवर नोंदणी करण्यापासून ते खताची निवड, GFR नुसार शिफारस, विक्रेत्याची निवड आणि क्यूआर कोडद्वारे खत प्राप्त करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. दरम्यान, अर्ज भरताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्जाच्या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अँपवर अचूक माहिती भरावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. प्रणालीच्या वापराबाबत अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी अथवा पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT