डोंबिवलीत DFCCL प्रकल्पाची पहिली टेस्ट राईड यशस्वी  
ठाणे

Thane News | ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक पाऊल : डोंबिवलीत DFCCL प्रकल्पाची टेस्ट राईड यशस्वी, मालवाहतूक व्यवस्थेत होणार क्रांती

डीएफसीसीएल प्रकल्पामुळे मालवाहतूक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून राबविण्यात येत असलेल्या डीएफसीसीएल अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Dedicated Freight Corridor Corporation of India Limited) कंपनीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून देशभरातील मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. सोमवारी पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव परिसरातून प्रथमच डीएफसीसीएल मार्गावर प्राथमिक टेस्ट राईड घेण्यात आली असून ती यशस्वी देखिल ठरली आहे. दिवा-पनवेल-भिवंडी शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर असलेल्या रेतीबंदर रोडला मोठागावच्या फाटकातून मालवाहतूक करणारी ही रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

डीएफसीसीएल प्रकल्पामुळे मालवाहतूक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून राष्ट्रीय पातळीवरील वाहतूक व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयामुळे हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक स्वतंत्र मार्गाने वळवल्याने जिल्ह्यातील विद्यमान रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक आणि वाहतूक कोंडी यामध्ये मोठा फरक पडणार आहे. परिणामी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, वेळेची बचत होईल तसेच अर्थकारण आणि औद्योगिक विकासालादेखील चालना मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत सोमवारी डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरातून प्रथमच डीएफसीसीएल मार्गावर प्राथमिक टेस्ट राईड घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्यामुळे पुढील कामकाजासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा नवा अध्याय ठरणार असून लवकरच नागरिकांना याचे प्रत्यक्ष फायदे जाणवतील, असा विश्वास भाजपाचे युवा नेते दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

डीएफसीसीएलमुळे देशाच्या आर्थिक विकासाला हातभार - दिपेश म्हात्रे

डीएफसीसीएल म्हणजे भारतीय समर्पित मालवाहतूक महामंडळ, जी रेल्वेने मालवाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी भारत सरकारची एक कंपनी आहे. या प्रकल्पामुळे मालगाड्यांना डेडिकेटेड ट्रॅक मिळतात, ज्यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढतो, वाहतूक कोंडी कमी होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. मालगाड्यांना प्रवासी गाड्यांपासून वेगळे मार्ग मिळाल्याने मालवाहतूक जलद होते.

यामुळे मालाची वाहतूक स्वस्त आणि वेळेवर होते, ज्यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळते. डीएफसीसीएलच्या प्रकल्पांमुळे विविध पदांसाठी भरती होते, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. नवीन मालस्थानके (Freight Stations) आणि रेल्वे मार्गांचे बांधकाम होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास डीएफसीसीएलमुळे भारतीय रेल्वेवरील मालवाहतूक अधिक प्रभावी, वेगवान आणि कार्यक्षम बनली आहे. ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागत असल्याचे भाजपाचे युवा नेते दिपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT