किन्हवली : संतोष दवणे
केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जवाहर नवोदय विद्यालय मंजूर व्हावे यासाठी 2018 पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. शुक्रवारी (दि.6) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरात नव्या 28 नवोदय विद्यालयांना मंजूरी देण्यात आली असून त्यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. याकामी ठाणे जिल्हा परिषदेत ठराव घेवून तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविण्यासाठी शहापूरकरांनी विशेष पुढाकार घेत पाठपुरावा केला होता.
सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले. मात्र 2014 ला ठाणे जिल्हा विभाजन झाल्यापासून ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय उपलब्ध होऊ शकलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे शहापूरमधील मळेगाव गटाचे तत्कालीन सदस्य राजेंद्र विशे यांनी डिसेंबर 2019 मध्ये जि. प.सभेत ठराव घेवून स्वतंत्र नवोदय विद्यालयाची मागणी राजकीय पटलावर आणली होती.
6 डिसेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 2300 कोटींची आर्थिक तरतूद करत देशात नव्या 28 नवोदय विद्यालयांना म्हणजेच पीएम श्री शाळांना मंजूरी दिली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील नव्या नवोदय विद्यालयासह 3 केंद्रीय विद्यालयांचाही समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे महाराष्ट्रात 33 नवोदय विद्यालये असून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघर तालुक्यातील माहीम येथे असणारे जवाहर नवोदय विद्यालय पालघर जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परिणामी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेशासाठी पालघरला जावे लागत असल्याने नवोदयकडे वळणार्या विद्यार्थ्यांचा टक्का घसरला आहे. अनेक उच्च दर्जाचे अधिकारी घडविणार्या या विद्यालयात दरवर्षी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून ठाणे जिल्ह्यातून सध्या 40 विद्यार्थ्यांना संधी मिळते. मात्र ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र विद्यालय मंजूरी मिळाली असल्याने आता गरीब कुटुंबांतील 80 प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे.
संपूर्ण ग्रामीण व डोंगरी तालुका असणार्या शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यासाठीचे स्वतंत्र नवोदय विद्यालय सुरू करावे अशी मागणी शहापूर विधानसभेचे तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी 2018 मध्ये शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. दरम्यान शहापूर तालुक्यातून दरवर्षी सर्वाधिक विद्यार्थी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत झळकत असतात. 2023 पर्यंत ही परंपरा कायम असून आता नव्याने मंजूर झालेले नवोदय विद्यालय मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या व रेल्वेने जोडलेल्या शहापूरातच सुरु करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय मिळत आहे. मात्र ते शहापूरमध्येच व्हावे अशी आमची आग्रही मागणी आहे.राजेंद्र विशे, माजी जि.प.सदस्य, ठाणे
शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असून येथील गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचे शिक्षण मिळावे यासाठी नवोदय विद्यालय शहापूरातच होणे गरजेचे आहे. केंद्राचा शासन आदेश पाहून राज्य सरकार व नवोदय विद्यालय समितीकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.आमदार दौलत दरोडा, शहापूर विधानसभा