केडीएमसीच्या कर्मचार्‍यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा file photo
ठाणे

Thane News | केडीएमसीच्या कर्मचार्‍यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा

Thane : 41 लाखांच्या रोकडसह 4 फ्लॅट हडपल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील एका नव्याने उदयास येणार्‍या विकासकाकडून सात वर्षांच्या कालावधीत 41 लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरूपात हडपणार्‍या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यासह त्याच्या चार पाच साथीदारांच्या विरोधात विकासकाने दिलेल्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा देखिल समावेश आहे.

विनोद लकेश्री, प्रशांत शिंदे, विलास शंभरकर, परेश शहा यांच्यासह गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरोधात निर्भय बनो संस्थेच्या माध्यमातून आवाज उठविणारे माहिती कार्यकर्ते महेश निंबाळकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या संदर्भात बांधकाम व्यवसायिक प्रफुल्ल मोहन गोरे (40, रा. रिजन्सी अनंतम्, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली-पूर्व) यांच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे आणि त्यांचे पथक फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

यातील विनोद लकेश्री हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. सद्या केडीएमसीच्या अ प्रभागातील घनकचर्‍याच्या गाडीवर कर्तव्यावर आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यलयाजवळ असलेल्या एका चहाच्या स्टॉलसमोर 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास याच विनोद लकेश्री यांच्यावर भूमाफियांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते.

या पाच जणांनी मिळून पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा परिसरात असलेल्या बांधकाम गृहप्रकल्पासंदर्भात तक्रारींचा वापर करून आपल्याकडून खंडणी स्वरूपात रोख आणि फ्लॅट उकळले. हा प्रकार 2018 ते 2024 या कालावधीत घडल्याचे बांधकाम व्यवसायिक प्रफुल्ल गोरे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिक विकासक प्रफुल्ल गोरे यांचे डिसेंबर 2018 पासून कुंभारखाणपाडा, देसलेपाडा, कोपर रोड, गोग्रासवाडी परिसरात इमारत बांधकाम प्रकल्प सुरू होते. या कालावधीत आरोपींनी विकासक प्रफुल्ल गोरे यांचे प्रकल्प अनधिकृत असून ते तोडण्यात यावेत म्हणून केडीएमसीसह इतर शासकीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या. गोरे यांच्या बांधकामांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकून या गृहप्रकल्पांमध्ये कुणी घरे घेऊ नयेत, यासाठी विकासकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

तक्रारी मागे घेण्यासाठी उकळले पैसे

या गृहप्रकल्पांच्या तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपींनी तक्रारदार विकासक प्रफुल्ल गोरे यांच्याकडून वेळोवेळी एकूण 41 लाख रूपये खंडणी स्वरुपात उकळले. तसेच डोंबिवली येथील गृहप्रकल्पातील 4 फ्लॅट खंडणी स्वरुपात जबरदस्तीने बळकावले. विकासक गोरे यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील विनोद लकेश्री आणि त्याचे तीन साथीदार फरार असून विष्णूनगर पोलिसांसह खंडणी विरोधी पथक त्यांचा शोध घेत आहे.

आपणास यासंदर्भात काहीही माहिती नाही. आपण डोंबिवलीतील सर्व बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अनेक वर्ष केडीएमसीकडे करत आहेत. त्या विरुध्द आपली उपोषणे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या विषयावरून केडीएमसी कारवाई करत नाही म्हणून आपण गेल्या साडेतीन वर्षापासून उपोषण करत आहोत. कुंभारखाणपाडा येथील बेकायदा गृहप्रकल्पाविषयी आपण आवाज उठविला आहे. बेकायदा बांधकामांच्या विरूध्द आवाज उठवितो म्हणून आवाज दाबण्यासाठी आपणास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा हा प्रयत्न आहे.
महेश निंबाळकर, संस्थापक, निर्भय बनो संस्था.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT