Case registered Pudhari File Photo
ठाणे

Navi Mumbai Illegal Mining | गौण खनिज चोरीप्रकरणी बिल्डर शाहुपुरजी पालोजी यांच्यावर गुन्हा

८.३० कोटींचा दंड थकविल्याने इमारतीतील एक मजला जप्त; सानपाडा पोलिसांत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shapoorji Pallonji FIR Registered

ठाणे : नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीरपणे माती व मुरुमाचा भराव केल्याप्रकरणी 'मे. साई प्रोजेक्ट प्रा. लि.'चे विकासक शाहुपुरजी पालोजी यांच्याविरुद्ध सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने ठोठावलेला ८ कोटी ३० लाख २३ हजार रुपयांचा दंड थकविल्याने यापूर्वी त्यांच्या प्रकल्पातील एका इमारतीचा पहिला मजला जप्त करून सीलबंद करण्यात आला होता.

नोव्हेंबर २०१८ मध्ये जुईनगर रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे पटरीलगत असलेल्या प्लॉट क्रमांक १८८ए आणि ९एम येथे शासकीय परवानगीशिवाय ७ हजार ९४९ ब्रास गौण खनिज माती व मुरुमाचा भराव केल्याचे आढळले होते. याप्रकरणी २०१८ ते २०२३ दरम्यान ठाणे तहसीलदार कार्यालयाने वारंवार नोटिसा बजावल्या. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही.

१८ जानेवारी २०२४ रोजी तहसीलदारांनी ८ कोटी ३० लाख २३ हजार १५२ रुपयांचा दंड १५ दिवसांत भरण्याचे आदेश दिले. दंड न भरल्याने १६ एप्रिल २०२५ रोजी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅट क्रमांक ०२ जप्त करून सीलबंद करण्यात आला.

तरीही दंडाची रक्कम न भरल्याने ग्राम महसूल अधिकारी प्रिया प्रताप पंडित यांच्या फिर्यादीवरून विकासकाविरुद्ध गौण खनिज चोरी, शासनाची फसवणूक व पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

गौण खनिज चोरीप्रकरणी १३ कंपन्यांना एकूण १७ कोटी ९७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरणाऱ्या अन्य कंपन्यांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिशा पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT