

Speeding car drags Navi Mumbai police officer for 200 meters in Kalamboli
नवी मुंबईः पुढारी वृत्तसेवा नवी मुंबईतील गजबजलेल्या कळंबोली परिसरातील रोडपाली येथे नाकाबंदी दरम्यान एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई (४३) यांना धडक दिली आणि त्यांना बोनेटवर २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. कार थांबविण्याचा इशारा देऊनही चालकाने पोलसांच्या अंगावर कार नेली. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून संबंधित कारसह दोन्ही आरोपींचा आता शोध सुरू आहे.
मिळाल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरात पोलीस पथक नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, एक संशयित भरधाव स्विफ्ट डिझायर गाडी त्या रस्त्याने आली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, खाकीचा कोणताही धाक न बाळगता चालकाने थेट समोर उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांचे म्हणणे न ऐकता कार पुढे ढकलली. कार चालक न थांबल्याने कॉन्स्टेबल भोई हे कारच्या बोनेटवर फेकले गेले.
भोई यांना बोनेटवर अडकलेल्या स्थितीतच तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि नंतर तिथून पळ तरीही याची पर्वा न करता नराधम चालकाने कार वेगाने पुढे नेत काढला. या भयानक अपघातात पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलीस नाकाबंदीला चकवा देऊन पसार झालेल्या या कारचा प्राथमिक तपास केला असता या स्विफ्ट डिझायर गाडीवर लावलेली नंबर प्लेट पूर्णपणे बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. गाडीत दोन व्यक्ती बसल्या होत्या. या अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार कार आणि आरोपींचा कसून शोध सुरू आहे. बनावट नंबर प्लेट लावण्याचे नेमके कारण काय, कार चालवणारे सराईत गुन्हेगार होते का, किंवा ही कार अन्य कोणत्या गुन्ह्यात वापरली होती का, अशा विविध मुद्द्यांवर पोलीस सखोल तपास करत आहेत.