TMC  pudhari photo
ठाणे

Thane Standing Committee Election : स्थायी समितीसाठी नगरसेवकांची फिल्डिंग!

राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित; शिवसेनेच्या नावांवर एकनाथ शिंदेंचा अंतिम निर्णय

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्रवीण सोनावणे

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया मार्गी लागणार असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपले उमेदवार निश्चित केले असले, तरी शिवसेनेच्या नऊ जागांवरील सदस्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याने कोणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक नऊ जागा मिळणार आहेत. भाजपाच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट आणि एमआयएमला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाने यासिन कुरेशी आणि पल्लवी जगताप यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तर अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नगरसेवक राजन किणी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

शिवसेनेमध्ये स्थायी समितीच्या नऊ जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. देवराम भोईर, संजय भोईर, मनोज शिंदे, राम रेपाळे, रमाकांत मढवी, सुधीर कोकाटे, मालती पाटील, अनिता गौरी, योगेश जानकर, दीपक वेदकर, प्रमिला केणी, सुखदा मोरे, परिषा सरनाईक आणि राजू फाटक यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सर्व नावांमधून कोणाला संधी द्यायची, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

यंदा स्थायी समिती सदस्यांना कामकाजासाठी तुलनेने कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे समितीमध्ये अनुभवी नगरसेवकांसोबतच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनाही संधी देण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची जाण, अनुभव आणि नव्या चेहऱ्यांना प्रतिनिधित्व अशा तिन्ही बाबींचा विचार करून अंतिम यादी तयार केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपामध्येही स्थायी समितीच्या तीन जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे.

मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, संजय वाघुले आणि मृणाल पेंडसे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, भाजपाकडून एका अनुभवी नगरसेवकासह दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.एकूणच, राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाले असताना शिवसेना आणि भाजपाच्या अंतिम याद्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून शिवसेनेतील कोणत्या नऊ नगरसेवकांना स्थायी समितीची संधी मिळते, हे २० नोव्हेंबरच्या सभेत स्पष्ट होणार आहे.

पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता

२० नोव्हेंबर रोजी स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर पुढील महिन्यात समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याने या पदासाठीही पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या समितीतील सदस्यत्वाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रशासनावर पकड असलेल्या आणि महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या नगरसेवकाला समितीत स्थान देण्याकडे शिवसेनेचा कल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT