Dilip Bartakke Pudhari
ठाणे

Dilip Bartakke: स्थायी समिती सभापतिपदी दिलीप बारटक्के यांची वर्णी; एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड निश्चित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्येष्ठ निष्ठावंताला मान

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची माळ अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या गळ्यात पडली आहे. सभापतीपदासाठी बारटक्के यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत केवळ औपचारिकता बाकी आहे.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड तब्बल दहा महिन्यांनंतर झाली होती. या निवडीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.

त्यानंतर आता स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत महापालिकेतील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार, याकडे महायुतीच्या नगरसेवकांचे लक्ष लागले होते.

त्यानुसार खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत बारटक्के यांनी महापालिका सचिव दिनेश तायडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

विरोधी पक्षांकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे बारटक्के यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कृष्णकांत पांचाळ यांच्या उपस्थितीत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

शिवसेनेचे नऊ, भाजपचे तीन सदस्य

१६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे नऊ, भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या संख्याबळामुळे स्थायी समितीमध्ये महायुतीचे स्पष्ट वर्चस्व आहे.

चार वेळा नगरसेवक

दिलीप बारटक्के हे सावरकरनगर प्रभाग क्रमांक १३ मधून सलग चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणारे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT