ठाणे महानगरपालिका pudhari photo
ठाणे

Thane Municipal Fake Companys: ठाणे महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा? बनावट कंपनीद्वारे बिले वसुलीचा आरोप

मल उदंचन केंद्राच्या कंत्राटात गैरप्रकार; चौकशीची मागणी, त्याच कंत्राटदाराला पुन्हा काम देण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महापालिका क्षेत्रातील मल उदंचन व प्रक्रिया केंद्राचे कंत्राट मिळालेल्या एका कंपनीच्या नावाने त्याच नावाची बनावट कंपनी स्थापन करून महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची बिले वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या प्रकरणी कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकाराची कठोर चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा सहा मल उदंचन केंद्रांचे काम देण्याची कार्यवाही सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिकेने मल उदंचन केंद्र व कोविड रुग्णालयाच्या मल प्रक्रिया केंद्राच्या परिचलन, निगा, देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट २०२० मध्ये मे. ए. के. इलेक्ट्रीकल अॅण्ड वर्क्स या कंपनीला दिले होते. या कंपनीचाच अनुभव वापरून निविदा मिळविण्यात आली होती. या कंपनीच्या विजया बँकेतील खाते क्रमांक ५०४४०७७११००००९ वर महापालिकेकडून सुरुवातीला देयके देण्यात आली होती, असे मनोहर डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.

काही महिन्यांनंतर उपनगर अभियंता (यांत्रिकी) यांच्या मर्जीनुसार कंत्राटदाराने मे. ए. के. इलेक्ट्रीकल अॅण्ड वर्क्स या कंपनीच्या नावाचीच दुसरी कंपनी तयार करून स्वतःची बिले त्या बोगस कंपनीच्या नावाने निविदा कालावधी पूर्ण होईपर्यंत घेतली. त्या कंपनीचे बँक खातेही वेगळे होते.

संबंधित प्रकार ३ नोव्हेंबर २०२१ रोजी उघड झाल्यानंतरही आजतागायत कंत्राटदारावर फौजदारी कारवाई किंवा महापालिकेकडून काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झालेली नाही. या प्रकाराला महापालिकेच्या यांत्रिक विभागातील उपनगर अभियंता यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा सहा ठिकाणच्या मल उदंचन केंद्रांचे काम १० वर्षांसाठी ३८ कोटी रुपयांना देण्याचा घाट घातला जात असल्याकडे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.

मलजलाऐवजी सोलारमधून वीजनिर्मिती

कोपरी येथील मल उदंचन केंद्रात मलजलापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने १० कोटी रुपये दिले होते. मात्र, तेथे सोलार सिस्टीमचा वापर करून वीजनिर्मिती करण्यात आल्याकडे मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे. या प्रकल्पातून महापालिकेला १० टक्के रॉयल्टी कधीही मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT