ठाणे : ठमहानगर पालिका मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ व परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बल ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहेत. त्यात 10 हजार 908 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात राहणार आहेत. तर त्याव्यतिरिक्त 6 हजार 295 होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या 6 कम्पन्या तर एक प्लाटून अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदानावेळी तैनात राहणार आहे.
गुरुवारी महापालिकेसाठी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून मतदान केंद्र परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 10 हजार 908 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तसाठी ड्युटीवर तैनात राहणार आहेत. यावेळी तर 6 हजार 295 होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या 6 तुकड्या तर एक प्लाटून अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदानावेळी तैनात राहणार आहे.त्यासाठी सर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भरारी पथके, उत्पादन शुल्क भरारी पथक, सायबर सर्व्हेलियन्स, व्हिडीओ सर्व्हेलियन्स असे विविध पथके देखील या मतदान प्रक्रियेवर करडी नजर ठेवून राहणार आहेत.
भरारी पथक व मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व प्रशासकीय पथकांसाठी एक हजाराहून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या मतदान केंद्रावर सिसिटीव्हीची नजर राहणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने गस्त घातली जाणार असून त्याद्वारे पोलीस संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवून राहणार आहेत.