ठाणे : भाजपच्या शीर्ष नेतृत्वकडून शिवसेनेसोबत युती करण्याचे आदेश आल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिकांच्या जागा वाटपाची चर्चा सुरु झाली. मुंबईत शिवसेना-मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जागांवर खलबते सुरु आहेत.
ठाण्यात शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना सर्वाधिक जागा लढविण्याचा निर्णय झाला असला तरी अपेक्षित जागांसाठी भाजप आणि काँग्रेस आग्रह कायम राहिल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. भाजपला 40 ते 45 जागा सोडल्या जाणार असून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याचा इशारा शहर कांॅग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देऊन महाआघाडीची चिंता वाढविली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेटत झाल्यानंतर जिल्ह्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेत शिवसेनेने भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बाजूला ठेवत वाटाघाटी सुरु केल्या आहेत. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेला एनसीपीला डावलण्यात आल्याचे सांगत एनसीपीने स्वबळाचा नारा दिला आहे. त्याचवेळी एनसीपी अध्यक्ष अजित पवार यांच्या माध्यमातून युतीमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. दुसरीकडे भाजपने दिलेला 49 जागांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला आहे. त्यामुळे किमान 45 जागा तरी द्यावेत असा आग्रह भाजपकडून होत आहे.
भाजपकडे 24 माजी नगरसेवक असून त्यांनी उबाठाकडे असलेल्या नगरसेवकांच्या जागांवर दावा ठोकला आहे. तसेच जेष्ठ नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर अशोक वैती यांच्या प्रभागात दोन-दोन जागा मागितल्या आहेत. त्याचवेळी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांच्या प्रभागात शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी नगरसेविकाला तिकीट देण्यास सरनाईक यांनी विरोध केल्याने गाडी अडली आहे.
शिवसेनेने 79 माजी नगरसेवकांना संधी देण्याचे अगोदरच जाहीर केल्याने भाजपला वागळे इस्टेट, वर्तकनगर, कळवा, दिवा या विभागात जागा सोडण्यास नकार दिला आहे. भाजपाला 40 जागा देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली असली तरी वाढीव 16 जागा कुठल्या पदरात पडणार आहेत, या चिंतेने इच्छुकांना ग्रासले आहे.
मुंबईत ठाकरे शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यातही महाविकास आघाडीच्या चर्चाना वेग आला आहे. मात्र काँग्रेसने 25 जागा मागितल्या असून आम्हांला सन्मानजनक जागा न सोडण्यास शिंदे शिवसेनेसोबत जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. तसेच कळव्यात निघालेल्या प्रचार रॅलीवरून चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही धारेवर धरत स्पष्टीकरणाची मागणी केली. त्याचवेळी रात्री मनसे, ठाकरे गट, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात जागा वाटपाची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती. हि चर्चा अंतिम टप्प्यात आणण्याबाबत नेत्यांचे एकमत झाले आहे.