दिलीप शिंदे
ठाणे : ऐतिहासिक ठाणे नगरीवर गेल्या १६३ वर्षापासून नगराध्यक्ष आणि महापौरांच्या रूपाने मराठी झेंडा डौलाने फडकत आलेला आहे. ब्रिटिश राजवटीत १८८५ मध्ये झालेल्या ठाणे नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नारायण वासुदेव खारकर या मराठी नगरसेवकाला नगराध्यक्षपदाचा मान मिळाला. तर शंभर वर्षानंतर महानगरपालिकेत रूपांतर झालेल्या ठाण्याच्या पहिल्या महापौरपदी सतीश प्रधान विराजमान झाले. सहा वर्षांचा काँग्रेसच्या कार्यकाळाचा अपवाद वगळता ३० वर्ष शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे. गंमत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवकांसाठीची आरक्षण पद्धत ब्रिटिश काळापासून लागू झाल्याचे दिसून येते.
सत्ता कायम राखण्यास शिवसेनेला यश
ठाण्याची शिवसेना , शिवसेनेचे ठाणे हे समीकरण शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे. १ जानेवारी १९६७ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि पुढील सात महिन्यात १३ ऑगस्ट १९६७ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्याने शिवसेनेचा सत्तेचा पहिला अभिषेक केला. ती सत्ता आजपर्यंत कायम राखण्यास शिवसेनेला यश आले आहे. अशा या ठाणे महापालिकेचा इतिहास फार जूना आहे. भारत देश पारतंत्र्यात असताना नागरिकाच्या मागणीवरून ब्रिटिश सरकारने ठाणे नगरपालिकेची स्थापन केली. त्यापूर्वी कल्याण नगरपालिका स्थापन झाली होती. भिवंडी ही तिसरी नगर पालिका निर्माण झाली. या तिन्ही नगरपालिकांना १६३ वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
पहिल्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार कलेक्टरकडे ठेवण्यात आला होता. भारतीय नगराध्यक्ष नियुक्त होण्याचा पहिला मान नारायण वासुदेव खारकर या अस्सल मराठी व्यक्तीला मिळाला. १८ या शतकाच्या अखेरीस ठाण्याचे नगराध्यक्षपदी मराठी झेंडा फडकला आणि आजही तो कायम आहे. शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वी ठाण्यावर काँग्रेसची सत्ता होती.
साष्टी प्रांत अर्थात आताच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगरपालिकेची स्थापना १ डिसेंबर १८६२ मध्ये झाली आणि १६ ऑगस्ट १८८५ मध्ये पहिली निवडणूक झाली. त्यावेळी सदस्यांना कमिशनर्स म्हटले जात असे. नगरपालिकेत कमिशनर्सची २० संख्या होती. १० सदस्य हे ब्रिटिश सरकार नियुक्त तर १० सदस्य हे जनतेतून निवडण्यात आले. पहिल्या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ६६४ होती. जे दरवर्षी ४ रुपये कर देत असतील त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्या निवडणुकीत ३ पारशी, २ ख्रिचन, १ ज्यू, १ मुसलमान आणि तीन हिंदू असे सदस्यांचे आरक्षण ठेवण्यात आले होते. त्या निवडणुकीत ६६४ पैकी ३२३ मतदारांनी मतदान केले. मात्र
ठाण्यात १ जानेवारी १९६७ रोजी शिवसेनेची शाखेची स्थापना झाली आणि ठाणे नगरपालिकेची निवडणूक १३ ऑगस्टला १९६७ रोजी झाली. त्यावेळी शिवसेनेचे १५ नगरसेवक जिंकून आले आणि नगराध्यक्ष वसंतराव मराठे यांच्या रूपाने ठाण्याने शिवसेनेला पहिला सत्तेचा राज्याभिषेक केला. नगराध्यक्ष मराठे यांच्या गावदेवी मैदानात झालेल्या सत्कारात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात नाट्यगृह आणि स्टेडियम उभारण्याचे वचन दिले. हे वचन पुढे १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले सतीश प्रधान यांनी पूर्ण केले. पुढे काँग्रेस सरकारने १ ऑक्टोबर १९८२ मध्ये ठाणे नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केले.
ठाण्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक
ठाणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक म्हणजे केवळ सत्तास्थापना नव्हे, तर पुढील अनेक दशकांच्या ठाण्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ‘नव्या नवलाईचा’ अध्याय ठरला . त्या काळात आजच्या सारखे युती व आघाड्यांचे राजकारण नव्हते. काँग्रेस, शिवसेना, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट, जनता पार्टी, कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्रपणे कार्यरत होते. ठाण्यामध्ये वसंतराव डावखरे, सुधाकर देशमुख, आनंद दिघे, सतीश प्रधान, मो. वा. जोशी, अरविंद पेंडसे, पं. वा. घाडगे, दशरथ पाटील (जनता दल) आदी विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचा दबदबा होता. कोणत्याच राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत नाही असा कौल मतदारांनी या निवडणुकीत दिला. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली. महापौरपदाच्या निवडणुकीत ३६ मते मिळवून सतीश प्रधान प्रथम महापौर झाले. त्यांनी काँग्रेसचे मनोहर साळवी यांचा पराभव केला. तर उपमहापौर पदावर सीताराम भोईर निवडून आले. स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे गोवर्धन भगत हे विराजमान झाले.
एक वर्षातच शिवसेनेची सत्ता संपुष्टात
पण शिवसेनेला पूर्ण काळ म्हणजे पाच वर्षे त्याचा आनंद मात्र उपभोगता आला नाही. काँग्रेसचे नगरसेवक वसंतराव डावखरे यांनी राजकारणाच्या शर्यतीवर असा काही ‘डाव’ टाकला की त्यामुळे त्यांचे डावपेच ‘खरे’ झाले. भाजपचे केवळ ४ सदस्य महापालिकेत निवडून आले होते. त्यातील ४ सदस्य यावेळी फुटले. काही अपक्ष सदस्य ही गळाला लागले. त्यावेळी फुटीर सदस्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा कायदा नव्हता. या घटनेमुळे एक वर्षातच शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन महापालिकेत काँग्रेसची राजवट सुरू झाली. काँग्रेसचे मनोहर साळवी महापौर झाले. ते दोन वर्षे महापौर होते. त्यानंतर काँग्रेसच्याच मोहन गुप्ते, अशोक राऊत व नजीम खान यांना महापौरपदाचा मान मिळाला.
“गद्दारांना क्षमा नाही”
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे घेऊन ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिले. तसेच जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पाठविला. बाळासाहेबांनी सर्व नगरसेवकांचे राजीनामे मंजूर करून संबंधित यंत्रणांकडे पाठवून दिले. ठाणे महानगरपालिकेत ही अभूतपूर्व घटना होती. कोणत्याही पालिकेत यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती आणि पुढे घडेल असे वाटत नाही. “गद्दारांना क्षमा नाही” या एकाच विषयावर ठाम राहून तडफदारपणे आनंद दिघे यांनी हा निर्णय घेतला आणि बाळासाहेबांनी त्यांच्या निर्णयाला संमती देऊन त्यांना हत्तीचे बळ दिले. त्यांनी आनंद दिघे यांचा जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा मात्र स्वीकारला नाही.
१९८६ मध्ये अस्तित्वात आलेले ठाणे महानगरपालिकेचे पहिले बोर्ड आजवरच्या महापालिका इतिहासातील सर्वांत अनुभवी बोर्ड म्हणून गणले जाते. सतीश प्रधान, मो. दा. जोशी, प्रकाश परांजपे, विलास सामंत, भास्कर पाटील, गोपाळ लांडे, दीपक देशमुख (सर्व शिवसेना), वसंत डावखरे, द्वारकानाथ पवार, मोहन गुप्ते, अशोक राऊत, सुभाष कानडे, मनोहर साळवी (काँग्रेस), वीणा भाटिया, सुभाष भोईर, गोवर्धन भगत, देवराम भोईर (भाजप), दशरथ पाटील (जनता दल) या नगरसेवकांचा दबदबा होता.
१९९३ मध्ये शिवसेनेचे अनंत तरे हे महापौरपदी निवडून आले आणि त्यांनी महापौरपदाची हॅट्रिक केली. ही किमया आनंद दिघे यांनी घडवून आणली होती. १९९३ पासून २०२२ पर्यंत सलग शिवसेनेची सत्ता ठाण्यावर आहे. सेनेच्या १३ महापौरांनी सत्ता गाजविली तर उपमहापौरपद घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा भाजपचा इतिहास राहिला आहे.
१९८६ मधील निकाल
शिवसेना – ३०
काँग्रेस – २५
भाजप – ५
शरद पवार काँग्रेस – १
जनता दल – १
अपक्ष – ३
एकूण – ६५