

ठाणे : ठाणे शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊ न नागरिकांना पुरेशा सेवासुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे नवीन प्रशासकीय भवन बांधताना पुढच्या 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र सभागृहाची निर्मिती करावी, असे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे नवीन प्रशासकीय भवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने कमीतकमी वृक्षतोड करून जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण करावे अशा सूचना देखील आयुक्त राव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवनाची इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक कामे वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडत आहे.
आगामी काळातील जागेची उपलब्धतता लक्षात घेऊ न रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला. या जागेतील बहुतांशी झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचे नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत कार्यालयांची जागा व आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊ न त्यानुसार नियोजन करण्यात यावे. तसेच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात यावे. तसेच मा. महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊ न बैठक व्यवस्था करावी, अशाही सूचना यावेळी दिल्या. तसेच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील, याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशी चर्चा यावेळी करण्यात आली.
सुसज्ज, अद्ययावत भवन होणार
सदर इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तुविशारद हफिझ कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना व महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सुसज्ज व अद्ययावत असे भवन उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले.
मृदापरीक्षणाचे काम सुरू
सद्यस्थितीमध्ये शहर विकास विभागामार्फत नकाशे व आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून मृदुपरीक्षणाचे काम सुरू आहे, तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यक त्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. अंदाजे 2027 मध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत या दृष्टीने नियोजन करून काम करावे, असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.