आर्थिक संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र येत्या काही काळात पुन्हा भक्कम होण्याची चिन्हे आहेत.  Pudhari News Network
ठाणे

Thane Municipal Economy: ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र पुन्हा भक्कम होणार

केंद्राच्या बिनव्याजी कर्जामुळे दायित्व अवघ्या 350 कोटींवर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आर्थिक संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र येत्या काही काळात पुन्हा भक्कम होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या स्वतःच्या निधीमधून करण्यात येणार्‍या खर्चात करण्यात आलेली काटकसर आणि केंद्राकडून मिळालेले 200 कोटींचे बिनव्याजी कर्ज यामुळे ठाणे महापालिकेवर असलेल्या दायित्वाचा आर्थिक भार अवघ्या 350 कोटींवर आला आहे.

याशिवाय आणखी 558 कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून येत्या काही काळात ठाणे महापालिकेवर दायित्व काहीच राहणार नाही. याशिवाय जीएसटीमधून येणारी रक्कम आणि पालिकेच्या विविध विभागातून येणार्‍या उत्पन्नामुळे हा सर्व महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार असल्याने ठाणे महापालिकेला पुन्हा आर्थिक वैभव मिळण्याची शक्यता आहे.

कोव्हीड काळापासून ठाणे महापालिकेवर आर्थिक संकट निर्माण झाले असून अजूनही ठाणे महापालिकेला आर्थिक उभारी मिळू शकलेली नाही. पालिकेच्या कर्मचार्‍यांचे पगार होतील एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. केवळ मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीमध्ये विशिष्ट रक्कम जमा होत आहे. तर इतर खर्च भागवण्यासाठी महापालिकेला जीएसटीवरच अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे एकतर केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन या योजनेतून सुरु आहेत तर दुसरे काही महत्वाचे प्रकल्प हे राज्य शासनाच्या निधीमधून सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा आर्थिक भार महापालिकेवर पडलेला नाही. चार वर्षांपासून ठाणे महापालिकेवर असलेले दायित्व तब्बल 3400 कोटींचे दायित्व होते. त्यानंतर दायित्वाचा भार 2742 कोटींपर्यंत येऊन ठेपला होता. मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या तीन वर्षात कमी झाला आहे. प्रत्येक वर्षी 600 ते 700 कोटींची बिले अदा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखल्यामुळे आता हे दायित्व अवघे 350 कोटींवर आले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेला आर्थिक बळ मिळणार

केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला 200 कोटींचे बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले आहे. तर 558 कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेने केंद्राकडे नव्याने प्रस्ताव पाठवला आहे. हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्याने यामुळे ठाणे महापालिकेला चांगल्या प्रकारे आर्थिक बळ मिळणार आहे. तर येत्या काही काळात दायित्वाचा भार शिल्लक राहणार नसल्याने पालिकेच्या तिजोरीत जमा होणारे जवळपास 1700 कोटींचा महसूल जमा होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र पुन्हा भक्कम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT