Thane 7 Crore Tender Pudhari
ठाणे

Thane 7 Crore Tender: ठाणे महापालिकेत ७ कोटींच्या टेंडरवरून खळबळ! नगरसेवक राजेंद्र फाटकांचा प्रशासनावर गंभीर आरोप

महासभेची मंजुरी नसताना निविदा उघडल्याचा आरोप; संबंधित कार्यकारी अभियंत्याला निलंबित करून टेंडर रद्द करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये एका बड्या कंत्राटदारासाठी ७ कोटींचे टेंडर देण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून हा घोटाळा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांनीच उघड केला आहे.

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध रस्त्यांच्या चरांचे पुष्टीकरण करण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यासाठी हा घोटाळा करण्यात आला असून विशेष म्हणजे महासभेची मान्यता नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा उघडण्यात आल्याने नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी मंगळवारी प्रभाग समितीमध्ये आंदोलन केले.

तर संबंधित कार्यकारी अभियंत्याला निलंबित करून हे टेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली असून कारवाई न झाल्यास फाटक यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वीही विविध घोटाळ्याचे आरोप झालेल्या ठाणे महापालिकेतील आणखी एक घोटाळा समोर आला असून हा घोटाळा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांनीच उघड केला आहे. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील जवळपास १६ रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सा. बां. विभागाच्या वतीने तयार केला.

यामध्ये विविध रस्त्यांमधील चरांचे पुष्टीकरणचे काम करण्यात येणार असून यासाठी महापालिका तब्बल ७ कोटी २ लाखांचा खर्च करणार आहे. मात्र हा प्रस्ताव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यावरून प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रस्तावावरून यापूर्वीच्या महासभेतही गोंधळ झाला असून फाटक यांनी या कामाला सर्वसाधारण सभेत विरोध दर्शवला होता.

फाटक यांनी प्रशासनावर गंभीर आरोपही केले होते, नक्की कोणाचे पुनर्पृष्ठीकरण करणार आहात? कार्यकारी अभियंत्यांचे की ठेकेदाराचे? एवढे मोठे टेंडर काढले जाते. यापूर्वीही वर्तकनगर प्रभागासाठी रस्त्यांवरील चरांच्या पुनर्पृष्ठीकरणासाठी ४ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते; परंतु काहीही काम झाले नव्हते.

आता पुन्हा तेच टेंडर ७ कोटींचे काढण्यात आले. हा विषय सभागृहात अद्याप मंजूर झालेला नाही; परंतु त्याचे टेंडर काढल्याचे फाटक यांनी सांगितले. ६० ते ७० लाखांचे किंवा १ कोटींचे काम असताना महापालिकेचे अधिकारी व अभियंते ७ कोटींचे टेंडर काढतात. नक्की काय चालले आहे? असा प्रश्न फाटक यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे हे टेंडर केवळ एका बड्या कंत्राटदारासाठी काढले असून बाकी लोकांना काहीही न कळवता, त्या एका कंपनीच्या लोकांना फक्त पेपर सबमिट करण्याची माहिती दिली व दुसऱ्या कंपनीला त्यांचे पेपर नसल्याने त्यांचे टेंडर बाद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

नगर अभियंत्यांनी स्वतः या पेपरची चौकशी करावी आणि तोपर्यंत ते टेंडर थांबवण्यात यावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली होती. सभागृहात टेंडर थांबवण्याचा निर्णय झाला असतानाही सा. बां. विभागाच्या वतीने सोमवारी हे टेंडर उघडण्यात आल्याने नगरसेवक फाटक यांनी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता राणे यांना प्रभाग समितीमध्ये जाऊन जाब विचारत आंदोलन केले.

महापौर गटनेत्यांचे मौन

यासंदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या दालनात नगरसेवक राजेंद्र फाटक व संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठकही झाली. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते पवन कदम हे देखील उपस्थित होते. या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला? टेंडर रद्द होणार का अशी विचारणा केल्यानंतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. केवळ राजेंद्र फाटक यांची समजूत काढण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

शौचालयाच्या कामासाठी निधी नाही

याच प्रभाग समितीमध्ये एका शौचालयाच्या कामासाठी निधी मिळत नसल्याने हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मात्र ज्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये बहुतांश रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे असताना पुन्हा याच रस्त्यांवर अशाप्रकारे कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT