ठाणे: ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करापोटी २४५ कोटी ५३ लाख ही केवळ ६ हजार ६६६ थकबाकीदारांकडे थकलेली असून मालमत्ता कर वसुलीमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
मालमत्ता कराची थकबाकी वसुली, चालू आर्थिक वर्षातील करमागणीचे संकलन आणि नव्याने करआकारणीस पात्र असलेल्या मालमत्तांचा शोध घेणे, तसेच एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना करदात्यांना आवाहन करणेबाबत विशेष कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे कठोर निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड तसेच सर्व प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकीचे प्रमाण, करदात्यांकडून मिळणारा प्रतिसाद आणि वसुलीतील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अपेक्षित महसूल संकलनाच्या तुलनेत वसुलीचा वेग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीने स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा. वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार दैनंदिन कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करावे आणि त्याचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
वसुलीसाठी स्वतंत्र पथके
मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीने स्वतंत्र वसुली पथके कार्यरत करावीत. थकबाकीदारांची वर्गवारी करून मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. करमागणी असलेल्या प्रत्येक मालमत्तेचा पाठपुरावा करून वसुलीची प्रगती निश्चित करावी.
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी ऑनलाइन पेमेंट प्रणालीचा अधिकाधिक प्रसार करावा. व्हॉट्सॲप, एसएमएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करदात्यांना नियमित संदेश पाठवून करभरणा करण्याचे आवाहन करावे. कर भरण्याच्या उपलब्ध डिजिटल सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
कामकाजाचा नियमित आढावा
मालमत्ता कर हा महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे कर वसुली ही केवळ नियमित प्रशासकीय प्रक्रिया न राहता महसूल वाढविण्याची विशेष मोहीम म्हणून राबविण्यात यावी. सर्व प्रभाग समित्यांनी निश्चित केलेली वसुलीची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत.
वसुलीच्या कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करून कामकाज करावे, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
मालमत्ता कर वसुलीमध्ये अपेक्षित परिणाम साधण्यासाठी स्वतंत्र पथके, सूक्ष्म नियोजन, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि मोठ्या थकबाकीदारांवरील कठोर कारवाई यांचा समन्वय साधून विशेष कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मोठ्या थकबाकीदारांसाठी स्वतंत्र मोहीम
प्रत्येक प्रभाग समितीतील एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या मालमत्तांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. अशा एकूण 6 हजार 666 थकबाकीदारांकडे सुमारे 245.53 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे बैठकीत निदर्शनास आले.
या मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करून प्रत्यक्ष संपर्क साधावा. थकबाकीदारांना तातडीने नोटिसा बजावाव्यात, वसुलीचा नियमित पाठपुरावा करावा आणि प्रत्येक प्रभाग समितीने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यास अथवा करभरणा करण्यास टाळाटाळ होत असल्यास संबंधित मालमत्तांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाईही करावी, असे निर्देश देण्यात आले.