Thane Municipal Corporation Fire Pudhari
ठाणे

Thane Municipal Corporation Fire: ठाणे महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागात आग; महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित, पालिकेचा दावा

आगीतून संशयाचा धूर वाढला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे काही काळ खळबळ उडाली. शहर विकास विभाग हा महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो.

बांधकाम परवानग्या, विकास आराखडे, विविध प्रकल्पांच्या मंजुरी तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय नोंदी आणि फाईल्स या विभागात असल्याने या घटनेकडे गांभीयार्ने पाहिले जात आहे. यापूर्वी २०२० मध्ये देखील याच विभागात आग लागल्याची घटना घडली होती.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.०७ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. प्राथमिक माहितीनुसार विभागातील युपीएस, पंखा आणि काही कागदपत्रांना आग लागली होती.

माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षा रक्षक आणि विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत सुमारे ८.३५ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे आग इतर कक्षांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

शहर विकास विभागात अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील फाईल्स ठेवण्यात येतात. त्यामुळे आग लागल्यानंतर या फाईल्सच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही आगीमुळे नेमके किती नुकसान झाले आणि कोणती कागदपत्रे बाधित झाली याची पडताळणी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

या आगीत संगणकाचा यूपीएस, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, महापालिकेची ई-आॅफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच, कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. आगीचे कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.

शहर विकास विभागातच नेमकी आग कशी लागते?

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा सवाल महापालिका मुख्यालयात इतर अनेक विभागांऐवजी नेमकी शहर विकास विभागातच आग कशी लागते? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

शहर विकास विभागातील टीडीआर मंजुरीसह विविध फाईलसंदर्भात सीबीआय, लाचलुचपत विभाग, उच्च न्यायालयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीची भीती व्यक्त केल्यानंतरही महापालिकेने कोणतीही सतर्कता घेतली नव्हती, असा आरोप करीत नारायण पवार यांनी आगीत जळालेल्या व गायब झालेल्या प्रत्येक फाईलचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

यापूर्वी शहर विकास विभागात १६ जून २०२० रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यावेळी एक एलईडी टीव्ही जळाल्याचा दावा महापालिकेने केला होता. त्यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२० रोजी नारायण पवार यांनी तत्कालीन आयुक्तांकडे आगीची भीती व्यक्त केली होती. तसेच शहर विकास विभागातील इलेक्ट्रिक व्यवस्था, अग्निशमक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी केली होती.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असा आरोप पवार यांनी केला. २०२० मध्ये तत्कालीन आयुक्तांनी रजेचा अर्ज दिल्यानंतर निवासस्थानी २०० हून अधिक फाईल्स मागविल्या होत्या. त्यामुळे शहर विकास विभाग हा कायम वादग्रस्त असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT