ठाणे : गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे.ठाणे महापालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असून गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे तब्बल 67 नगरसेवक निवडणूक आले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर बसला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ठाण्याचे चित्र काही प्रमाणात वेगळे असून गेल्या काही वर्षात भाजपची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचे आव्हान असणार आहे हे निश्चित मानले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता सोमवारपासूनच जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासुन प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेची अखेर सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 2017 साली घेण्यात आली होती. मागील निवडणूकही चारच्या पॅनलमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आणि भाजप हे मागील निवडणुकीतही युतीमध्ये लढले नव्हते. 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 67 नगरसेवक निवडणून आले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे पूर्ण ताकदीने शिवसेने या निवडणुकीत उतरली होती.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तेव्हा फूट पडली नव्हती. त्यामळे शिवसेनेनंतर राष्ट्रावादीचे 34 नगरसेवक निवडणून आले होते. त्यापोठापाठ भाजपचे 23, काँग्रेसचे 3 तर एमआयएमचे दोन नगरसेवक निवडणून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली असल्याने यापूर्वी शिवसेनेतुन निवडणून आलेले बहुतांश नगरसेवकांनी फुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. तर भाजपची ताकद या ठिकाणी वाढली असल्याने युतीचे संकेत मिळूनही या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपमध्येच होण्याची चिन्हे आहेत.