Thane Politics Pudhari
ठाणे

Thane Politics: ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेतील धुसपूस कायम

नारी शक्ती वंदन विधेयकावरील सभा तहकुबी नाकारल्याने भाजपची शिवसेनेविरोधात निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: सत्तेत एकत्र असूनही शिवसेना आणि भाजपमधील धुसपूस कमी होत नसल्याचे चित्र वारंवार ठाणे महापालिकेच्या सभागृहात पाहायला मिळत आहे. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत संसद व राज्याच्या विधानसभांमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर, उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढील महासभेत पुन्हा हा विषय मांडण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेत नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली. महिला आरक्षणाला विरोध करण्यातून विरोधी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, याकडे लक्ष वेधत नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व महापालिका सचिव यांना सोमवारची महासभा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्ह दिवसभरासाठी तहकूब करावी, अशी मागणी केली.

मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून संसद व विधानसभेत महिलांना जादा प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयक नामंजूर केले. देशातील 70 कोटींहून अधिक महिलांचा हा अपमान होता, असे भरत चव्हाण यांनी सांगितले. या विषयावर सभा तहकूबीची मागणी भरत चव्हाण यांनी केली होती. तर नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

विषय समित्यांच्या स्थापनेवरून शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान

ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी, स्थायी समिती, विषय समित्या तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अद्याप प्रलंबित आहेत. यावरून केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणेकरांच्या हितासाठी तरी सर्व समित्या लवकरात लवकर स्थापन करा, असा टोला लगावत आ. केळकर यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर शरसंधान केले.

भाजपच्या गटनेते कार्यालयाचे उद्घाटन

भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतील भाजपच्या गटनेते कार्यालयाचे उदघाटन सोमवारी करण्यात आले. त्यावेळी आमदार केळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या कारभारावर टीका केली आहे. आमदार केळकर म्हणाले,विकासाचा जो जो काही मुद्दा असेल.

त्या विकासाच्या मुद्द्याला ठाणेकरांना कशाप्रकारे जोडता येईल आणि त्या दृष्टीने ठाणेकरांना त्याचा कशाप्रकारे उपयोग होईल हे निश्चितपणे बघून योग्य पद्धतीने भाजप त्या गोष्टीला पाठिंबा देणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. वाढत्या शहराच्या समस्या, निरनिराळे विकास प्रकल्प या सर्व गोष्टींचे निर्णय लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी घेतात. त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे गटनेते कार्यालय लोकांसाठी उपलब्ध झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT