

ठाणे: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषद कृषी विभागाने आवश्यक खत व बियाण्यांचे नियोजन पूर्ण केले असून शेतकऱ्यांना वेळेवर निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे. हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षासह विविध पातळ्यांवर तक्रार निवारण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सरासरी सुमारे 60 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जातात. त्यापैकी भात हे प्रमुख पीक असून सुमारे 55 हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली असते. मागील वर्षी 55,143 हेक्टरवर भात लागवड झाली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून भात व तूर पिकांसाठी आवश्यक बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे.
खत उपलब्धतेच्या दृष्टीने कृषी विभागाने 11,088 मेट्रिक टनांची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून 11,550 मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला असून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि संयुक्त खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामात खतांची टंचाई भासणार नसल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
बियाणे उपलब्धतेबाबत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तसेच खाजगी उत्पादक कंपन्यांमार्फत पुरवठा करण्यात येणार असून सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे वेळेवर मिळावीत यासाठी संबंधित यंत्रणांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या आणि भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. खरीप हंगामादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्वरित प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.