Thane Municipal Corporation Pudhari
ठाणे

Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ; महायुतीतच सेना-भाजप संघर्षाची ठिणगी

प्रशासकीय राजवटीतील खर्चाचा हिशोब मागत भाजप आक्रमक; सभागृहात उपमहापौरांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेतील कारभाराविरोधात भाजपने राळ उठवून भाजपचा महापौर बसविण्याची घोषणा केली. शिवसेना - भाजपमधील संघर्ष पेटला असताना अचानक महायुतीची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली. मात्र पालिकेच्या पहिल्याच सभेत तीन वर्षातील प्रशासकीय राजवटीतील खर्चाचा हिशोब मागितल्याने एकच गोंधळ उडाला. उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह भाजप नगरसेविकांनी सत्तेविरोधात आक्रमक भूमिका घेऊन थेट शिवसेनेला दिलेले आव्हान म्हणजे सेना-भाजप संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे म्हटले जात आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप महायुतीचा एकतर्फी विजय झाला आणि शिवसेनेचा भगवा फडकला. ज्या ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिली त्याच ठाणेकरांनी गेली 30 वर्ष शिवसेना-भाजप युतीला साथ दिली. शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील हे विराजमान झाले. महापालिकेची 20 फेब्रुवारीला झालेली पहिली सभा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली होती.

तहकूब सभेत पालिकेतील आगामी कामकाज आणि त्यातून होणाऱ्या संघर्षाची झलक पाहायला मिळाली.

प्रशासकीय राजवटीत राज्य सरकारकडून किती निधी आला आणि कसा व कुठे खर्च झाला याची माहिती भाजपच्या नगरसेविका मृणाली पेंडसे केली. मात्र माहिती घेऊन दिली जाईल असे नेहमीच्या पठडीतील उत्तर प्रशासनाने देऊन सभा गुंडाळली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका नगरसेवकाला प्रश्न विचारण्यास संधी दिली असताना भाजपच्या नगरसेवकांना नागरी प्रश्न विचारण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावरून गोंधळ वाढू लागला आणि पहिल्याच सभेत उपमहापौर कृष्णा पाटील यांना व्यासपीठावून खाली उतरून सदस्यांसोबत सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाविरोधात आवाज बुलंद करावा लागला.

सभागृहातील भाजपची आक्रमक भूमिका पाहता शिवसेनेने चर्चेविनाच सर्व विषय मंजूर करण्याची परंपरा कायम ठेवल्याची चर्चा रंगली आहे.

विरोधी पक्ष आणि स्वकीयांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होणार?

राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत असून ठाण्यातही दोघांची सत्ता आहे. मात्र भाजपाला फारसे महत्व दिले जात नसून शिवसेनेचा एकहाती कारभार सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने सत्तेत राहून जनतेच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. यातून सेना-भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनियुक्त सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि गटनेते पवन कदम यांना आपल्या अनुभवाची कसोटी लावून सभागृह कसे सुरळीत चालेल यासाठी तारेवरची कसरत साधावी लागणार आहे. यापूर्वी खासदार नरेश म्हस्के हे सत्ताधाऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम करीत असत. आता महापौर पिंपळोलकर ह्या नवीन असल्याने अनुभवी सदस्य कशाप्रकारे पुढे येऊन विरोधी पक्ष आणि स्वकीयांच्या प्रश्नाची सोडवणूक करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.ल

पालिका इतिहासातील पहिलीच घटना

सभागृहाबाहेर देखील भाजप नगरसेविकांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न मांडण्यास अडथळा आणणाऱ्या सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करीत पुढील सभा चालू देणार नाही, याचा इशारा दिला. विरोधी पक्ष शांत असताना सत्ताधाऱ्यांमधील एका पक्षाने पालिकेच्या पहिल्याच सभेत जनतेच्या प्रश्न, हक्कासाठी सभागृहात बोलून द्यावे, यासाठी राडा घालण्याची ठाणे महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना घडली आहे. हा राडा आगामी काळातील शिवसेना - भाजप युतीमधील संघर्षाची नांदी असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT